रिक्षा व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी ‘ऑटोॲप’ (व्हिडिओ)

अशोक गव्हाणे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

रिक्षाचालकांसाठी काहीतरी करण्याची वडिलांची तळमळ जाणवत होती. आंतरराष्ट्रीय नोकरीची संधी सोडून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ऍप तयार केले आहे. रिक्षात बसल्यानंतर प्रवासी अनेकदा रिक्षात आपल्या वस्तू विसरतात. नंतर रिक्षाचा नंबरही आठवत नाही. या ऍपमुळे रिक्षात बसल्यानंतर सर्व माहिती प्रवाशाच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. ऍपचा रिक्षाचालक व प्रवासी असा दोघांनाही फायदा होईल.
- राहुल शितोळे, अभियंता

 

रिक्षाचालकाच्या मुलाची निर्मिती; स्पर्धेच्या युगात फायदेशीर

पुणे : रिक्षाचालकाच्या मुलाने उच्च वेतनाची व परदेशातील नोकरीची संधी सोडून रिक्षाचालकांच्या आर्थिक प्रगतीसाठी "ऍटोऍप' (AutoApp) तयार केले आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याबरोबरच खासगी कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकू शकतील, असा दावा राहुल शितोळे या अभियंत्याने केला आहे.

राहुलचे वडील राजेंद्र शितोळे हे 1995पासून शहरात रिक्षा चालवतात. रिक्षाचालकांसाठी काहीतरी करण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी राहुलची मदत घेण्याचे ठरवले. रिक्षा व्यवसाय करून त्यांनी मुलाला उच्च शिक्षण दिले. राहुलने पुढे मोठ्या कंपनीमध्ये काही काळ नोकरीही केली. तसेच जर्मनीमधील पुस्तकाच्या संशोधनासाठी काम केले. इटालियन विद्यापीठामध्ये त्याला नोकरीची संधी मिळाली होती. परंतु, नोकरी न करता रिक्षाचालकांसाठी ऍप तयार करण्याचे त्याने ठरवले. वडिलांची मदत घेऊन रिक्षाचालकांच्या आर्थिक प्रगतीसाठी "ऍटोऍप' तयार केले आहे.

याबाबत राजेंद्र शितोळे म्हणाले, ""शहरामध्ये हजारो रिक्षाचालक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अनेकांना आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागते. शिवाय शहरामध्ये खासगी कंपन्यांची रिक्षाचालकांबरोबर स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत रिक्षाचालक टिकून राहण्यासाठी मुलाची मदत घेऊन ऍप तयार केले आहे. या माध्यमातून रिक्षाचालकांना व प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. यामध्ये आर्थिक सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आले आहे. या ऍपचा वापर करणाऱ्या रिक्षाचालकांना वैद्यकीय विमा, थर्ड पार्टी विमा, रिक्षा दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीसह विविध फायदे मिळणार आहेत.''

ऍपची वैशिष्ट्ये
- रिक्षाचालकांसाठी ऑफलाइन ऍप
- प्रवाशांच्या सुरक्षिततेला महत्त्व
- प्रवाशाला माहिती एसएमएसद्वारे मोबाईलवर मिळणार.
-ऍपमुळे रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती सुधारणार
-रिक्षाचालकांसाठी विविध कल्याणकारी योजना.

"ऍटोऍप' हे महिला व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आहे. अनेकदा प्रवासी व रिक्षाचालकांमध्ये भाड्यावरून वाद निर्माण होतात. परंतु, प्रवाशांनी आपला मोबाईल क्रमांक रिक्षाचालकाकडे दिल्यास या ऍपमुळे रिक्षात बसण्यापूर्वीच भाड्याची रक्कम दोघांनाही समजणार आहे.
- हेमंत जाधव, अध्यक्ष, रिक्षा संघटना.

Web Title: rikshaw driver son rahul shitole creat AutoApp for rikshaw driver at pune