रिंगरोडच्या "डीपीआर'चे काम सुरू 

रिंगरोडच्या "डीपीआर'चे काम सुरू 

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पूर्व भागातील रिंगरोडच्या दुसऱ्या टप्प्याचा "सर्वंकष प्रकल्प अहवाल' (डीपीआर) तयार करण्याचे काम अमेरिकन कंपनीकडून सुरू करण्यात आले. त्यासाठी काही ठिकाणी ड्रोनचा वापर करून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खेड, हवेली, पुरंदर आणि भोर अशा चार तालुक्‍यांतून जाणारा हा दुसरा टप्पा सुमारे 62 किलोमीटर लांबीचा असून, पुरंदर येथील नियोजित विमानतळाजवळून तो नेण्यात आला आहे. 

या रिंगरोडच्या पश्‍चिम भागातील सर्वेक्षणाचे काम यापूर्वीच झाले आहे. त्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्यास मान्यता मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

पूर्व भागातील रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले आहे. त्यासाठी तीन पर्यायी मार्गांचा विचार करण्यात आला होता. मध्यंतरी स्टेअरिंग कमिटीच्या बैठकीत एका मार्गास मान्यता देण्यात आली. आता या मार्गाचा ईकॉम या अमेरिकन कंपनीकडून "सर्वंकष प्रकल्प अहवाल' तयार करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत कंपनीला देण्यात आल्याचे "एमएसआरडीसी'च्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हा टप्पा सुमारे 62 किलोमीटर लांबी असणार आहे. चार तालुक्‍यांतून तो जाणार आहे. नगर रस्त्यावरील मरकळपासून तो सुरू होणार असून, पुणे-सातारा रस्त्यावरील वरवे बुद्रुक येथे येऊन मिळणार आहे. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर जाण्यासाठीचा मार्गदेखील त्यामुळे उपलब्ध होईल. "पीएमआरडीए'ने हाती घेतलेल्या रिंगरोडला समांतर असलेला भाग वगळून "एमएसआरडीसी'ने नव्याने सर्वेक्षण करून या रिंगरोडची आखणी केल्याचे "एमएसआरडीसी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

"एमएसआरडीसी'च्या रिंगरोडची लांबी  - 166 किलोमीटर 
आवश्‍यक जागा  - 2300 हेक्‍टर 
अपेक्षित खर्च  - 14 हजार कोटी 

असा असेल दुसरा टप्पा 
"एमएसआरडीसी'कडून पहिल्या टप्प्यात 66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पूर्व भागातील रिंगरोडचे काम हाती घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील रिंगरोड हा मरकळ, सोळू, लोणीकंद, भिवरी, कोरेगाव मूळ, सानोरी, दिवे, चांबळी, हिवरे, गराडे, कांबरे, वरवे बुद्रुक असा असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com