
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीच्या केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) रिंगरोडबरोबरच रिंगरेल्वेची शिफारस केली आहे.
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या हद्दीच्या केलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) रिंगरोडबरोबरच रिंगरेल्वेची शिफारस केली आहे. तळेगाव येथून ही रेल्वे प्रस्तावित करण्यात आली असून ती चाकण, शिक्रापूर, उरुळी काचंन ते पुणे-मिरज रेल्वेमार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतुकीलाही या रेल्वेचा उपयोग होणार आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीचा आराखडा तयार करण्यासाठी "पीएमआरडीए'ने यापूर्वीच निविदा मागवून एल. अँड टी. कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीकडून यापूर्वीच "पीएमआरडीए'च्या शहर आणि शहरालगतच्या सुमारे वीस किलोमीटर लांबीच्या हद्दीचा सीएमपी तयार करून "पीएमआरडीए'ला सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे-पिंपरी-चिंचवड आणि तिन्ही कॅंटोन्मेंटसह सुमारे दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी मेट्रोसह सुमारे 54 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या पहिल्या टप्प्यातील वाहतूक आराखड्यास "पीएमआरडीए'ने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
त्यामध्ये पुणे-लोणावळा रेल्वेमार्गाबरोबरच नव्याने रिंगरेल्वेची शिफारस करण्यात आली आहे. ही नियोजित रिंगरेल्वे प्रस्तावित पुरंदर विमानतळाजवळ नेण्यात आली आहे. चाकण, पुणे आणि शिक्रापूर ही तिन्ही शहरे या रिंगरेल्वेला जोडण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला रेल्वे प्रशासानेदेखील मान्यता दिली आहे. तसेच, ही रिंगरेल्वे दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोमार्गाला जोडण्याची शिफारस करण्यात आली आहे. तळेगाव, चाकण, शिक्रापूर येथील औद्योगिक वसाहतींना मालवाहतुकीसाठीही याचा फायदा होणार आहे.
प्रकल्पाविषयी
- प्रवासी व मालवाहतुकीचा विचार करून रिंगरेल्वेचा प्रस्ताव
- रिंगरेल्वे पुणे-मिरज आणि पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला जोडणार
- रिंगरेल्वेला मेट्रो प्रकल्पाची जोड देणार
- रेल्वे प्रशासनाकडूनदेखील रिंगरेल्वेला मान्यता