रिंगरोडच्या जमिनींवर एजंटांचा डोळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

खेड शिवापूर - शिवरे (ता. भोर) आणि परिसरातील गावातील प्रस्तावित रिंगरोड लक्षात घेऊन पुण्यातील अनेक जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपला मोर्चा आता या भागाकडे वळविला आहे. मुळात येथील रिंगरोडविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचा फायदा घेऊन रिंगरोडविषयी शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन एजंट लोकांनी या भागात सध्या जमीन खरेदी-विक्रीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

खेड शिवापूर - शिवरे (ता. भोर) आणि परिसरातील गावातील प्रस्तावित रिंगरोड लक्षात घेऊन पुण्यातील अनेक जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपला मोर्चा आता या भागाकडे वळविला आहे. मुळात येथील रिंगरोडविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचा फायदा घेऊन रिंगरोडविषयी शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन एजंट लोकांनी या भागात सध्या जमीन खरेदी-विक्रीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

पुणे-सातारा रस्त्यालगत असलेल्या शिवरे आणि परिसरातील गावातील पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडी) प्रस्तावित रिंगरोडची जोरदार चर्चा आहे. हा रिंगरोड कोठून जाणार, कोणते गट बाधित होतात, भूसंपादन कधी होणार, त्याचा मोबदला कसा मिळणार अशा अनेक गोष्टींविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. मध्यंतरी रिंगरोडचे नकाशेही व्हॉट्‌सॲपवर फिरत होते. मात्र ते अधिकृत आहेत की नाही याबाबत निश्‍चित सांगता येत नसल्याचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच रिंगरोडविषयी शेतकऱ्यांमध्ये असे गोंधळाचे वातावरण आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन पुण्यातील एजंट लोकांनी शिवरे आणि परिसरातील गावातील जमिनींकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक एजंट लोकांच्या या भागात जमीन खरेदी-विक्री संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.

रिंगरोडविषयी चुकीची माहिती देऊन हे एजंट शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मोठमोठे खरेदीदार गाठून या भागात जास्तीत जास्त जमिनीचे क्षेत्र खरेदी करण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती एका महसूल कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’ला दिली.

जमिनी न विकण्याचे आवाहन
पुण्यात नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवार (ता. १२) झालेल्या बैठकीत रिंगरोडच्या दोन्ही बाजूच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात यावी, असा मुद्दा मांडण्यात आला. तर गेल्या महिन्यात पालकमंत्री गिरीश बापट यांनी कल्याण (ता. हवेली) येथे झालेल्या कार्यक्रमात या भागातून रिंगरोड जाणार असून भविष्यात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे तुमच्या जमिनी विकू नका, असे आवाहन केले होते.

तलाठी कार्यालयांमध्येही माहिती घेण्यासाठी गर्दी
या भागातील जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंट लोकांचा वाढलेला सुळसुळाट सध्या चर्चेचा विषय झाला आहे. 

या एजंट लोकांकडून रिंगरोडविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना जमिनी विक्रीसाठी गळ घातली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे जमिनी विकण्यासाठी या एजंट लोकांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे या भागातील अनेक गावच्या तलाठी कार्यालयांमध्येही गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.

Web Title: ringroad land agent