रिंगरोडचे काम पुढील महिन्यात - बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

खेड - शिवापूर - पुणे जिल्ह्याभोवती एकूण १३१ किलोमीटर लांबीचा रिंगरोड होणार आहे. त्यापैकी ३० किलोमीटरची जमीन ताब्यात आली असून, पुढील महिन्यात रिंगरोडचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.

खेड - शिवापूर - पुणे जिल्ह्याभोवती एकूण १३१ किलोमीटर लांबीचा रिंगरोड होणार आहे. त्यापैकी ३० किलोमीटरची जमीन ताब्यात आली असून, पुढील महिन्यात रिंगरोडचे काम सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे दिली.

कल्याण (ता. हवेली) येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, कल्याणच्या सरपंच कुंदा डिंबळे, उपसरपंच अभिजित डिंबळे, अरुण राजीवडे, राजाभाऊ डिंबळे, मनोहर डिंबळे आदी या वेळी उपस्थित होते. या रिंगरोडसाठी जमिनी द्या, त्याचे पैसे तुम्हाला मिळतील, असे आवाहन बापट यांनी या वेळी ग्रामस्थांना केले. 

बापट म्हणाले, ‘‘या भागातून रिंगरोड जाणार असल्याने या भागात उद्योग-व्यवसाय वाढणार आहेत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे तुमच्या जमिनी विकू नका. रिंगरोडच्या माध्यमातून तुमच्या भागाचा विकास होणार आहे. त्यामुळे विकासकामांना अडथळा करू नका. रिंगरोडचे अधिकारी येतील, त्यांना सहकार्य करा.’’

पुण्याभोवती १३१ किलोमीटरचा रिंगरोड होत आहे. त्यातील ३० किलोमीटरची जमीन ताब्यात आली आहे. पुढील महिन्यात रिंगरोडचे काम सुरू होणार असल्याचेही बापट यांनी या वेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी आपण काही तरी केले पाहिजे, अशी भावना प्रत्येक लोकप्रतिनिधीची असायला पाहिजे, असे मत आमदार तापकीर यांनी व्यक्त केले.

Web Title: ringroad work girish bapat