काळजी घ्या! वाढत्या प्रदूषणामुळे लहानग्यांच्‍या मेंदूवर होतोय परिणाम

Childs
Childs

पुणे : एकीकडे कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. तर दुसरीकडे वाढत्या प्रदूषणामुळे लहानग्यांसाठी दुहेरी धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच अचानक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर रस्त्यावर आलेल्या गाड्यांमुळे वायुप्रदूषणातही काही प्रमाणात भर पडली आहे. दक्षिण आशियातील ३३.४ टक्के लहान मुले प्रदूषित शहरांमध्ये राहत असल्याचा युनिसेफचा अहवाल सांगतो. तर हवेची गुणवत्ता गाठू न शकणाऱ्या शहरांची सर्वाधिक संख्या राज्यात असून, लहान मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. प्रदूषित हवेमुळे लहान मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी येतात. परिणामी मुलांना एखादी गोष्ट अधिक काळ लक्षात न राहणे, विसर पडणे अशा समस्यांना सामोरे जावावे लागते, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.

याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘‘धोकादायक वायू हे श्र्वसनाच्या मार्गातून शरीरात प्रवेश करतात. तेव्हा ते काही प्रमाणात रक्तात मिसळतात आणि मेंदूतही जातात. यामध्ये कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारख्या वायूंचा समावेश आहे. मेंदूला सूज येणे तसेच मेंदूवर होणाऱ्या परिणामामुळे श्र्वासावरील नियंत्रण कमी होणे, हृदयावरील नियंत्रण कमी होणे अशा समस्या उद्भवतात, तर प्रदूषणाचा सर्वाधिक धोका एक वर्षाच्या खालील मुलांना असतो.’’

गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे प्रदूषणात घट झाली होती. सध्याच्या निर्बंधामुळे सर्व काही बंद असल्याने प्रदूषणाला नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होईल. मात्र सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरू झाल्यास नक्कीच प्रदूषणात वाढ होईल. तसेच कोरोना आणि प्रदूषण या दोन्हीचा परिणाम लहान मुलांवर होऊ शकतो, असेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.

सहा महिन्यांपर्यंत नवजात बालकांमध्ये फुफ्फुसांचा पूर्णतः विकास झालेला नसतो. अशा काळात लहान मुलांचा संपर्क जर प्रदूषित हवेशी आला तर, त्यामुळे कायम स्वरूपाच्या फुफ्फुसांशी संबंधी आजार उद्भवू शकतात. गेल्या दहा वर्षात लहान मुलांमध्ये अशा प्रकारच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
- डॉ. अदिती शहा, बालरोगतज्ज्ञ

काय होतो परिणाम किंवा आजार
- मानसिक आणि शारीरिक वाढ कमी
- मेंदूपर्यंत रक्ताचा प्रवाह कमी
- मेंदूचा विकास कमी
- मेंदूचा किंवा चेतापेशीचा (न्यूरॉन्स) कर्करोग किंवा अल्झायमर रोग

हे करा -
- प्रदूषणाचे प्रमाण अधिक असलेल्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे.
- लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- घरातील प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा वापर टाळावा.

मेंदूच्या विकासावर परिणाम करणारे प्रदूषक
- अतिसूक्ष्म धुलिकण (पीएम २.५)
- मॅग्नेटाईट
- पॉलिसायक्लिक अरोमॅटीक हायड्रोकार्बन्स (पीएएच)

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com