जैवसाखळी ढासळतेय

संभाजीनगर - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळील पाणथळ्यावरील बदकांच्या पिलांचा थवा.
संभाजीनगर - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळील पाणथळ्यावरील बदकांच्या पिलांचा थवा.

पिंपरी - नागरीकरण व प्रदूषणामुळे शहरात आढळणाऱ्या अकरांपैकी नऊ जातींचे मासे व चारपैकी एक विषारी साप आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले सहा पाणथळेही नष्ट झाली आहेत. तसेच, माणसांचा वावर वाढल्याने काही पाणथळ्यांवरून पक्षी स्थलांतर करीत आहेत. परिणामी, शहरातील जैवसाखळीवर विपरीत परिणाम होत आहे.

मुळा, पवना, इंद्रायणी नद्या; हिरवीगार दुर्गादेवी टेकडी, दगडखाणीमध्ये पावसाचे पाणी साचून पशुपक्ष्यांसाठी निर्माण झालेले पाणथळ, बागायती शेती, अशी वैभवशाली निसर्गसंपदा पिंपरी-चिंचवड शहराला लाभली आहे. परंतु, गेल्या दहा-बारा वर्षांपासून झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. नद्यांचे प्रदूषण वाढले आहे. त्यांच्या पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण घटल्यामुळे माशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी, माशांवर उपजीविका करणारे पक्षी स्थलांतर करू लागले आहेत. ते रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी, पक्षिप्रेमी, सर्पमित्रांचे प्रयत्न सुरू आहेत. 

पाणथळ नष्ट झाली
मुळा, पवना, इंद्रायणी नद्यांसह दगड खाणींमुळे शहरात पक्ष्यांसाठी पाणथळ उपलब्ध होते. आता केवळ स्पाइन रस्त्यालगत संभाजीनगरमधील सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प परिसर, दुर्गादेवी टेकडीवरील तलाव, चऱ्होली-निरगुडीदरम्यानचा इंद्रायणी नदीवरील डोह आणि टाटा मोटर्स कंपनीचा पिंपरीतील सरोवर इतकेच पाणथळ राहिले आहेत. दत्तनगरजवळील खाण व मोशी कचरा डेपोलगतचा तलाव बुजविला आहे. भोसरीतील गावतळे, संभाजीनगर खाणीच्या परिसर बर्डव्हॅली अशा पाणथळांवर माणसांचा वावर वाढल्यामुळे पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे. दुर्गादेवी टेकडीवरील तलाव व प्राधिकरणातील गणेश तलावाचीही हीच स्थिती आहे.

माशांच्या जाती घटल्या 
पूर्वी शहरातील नद्यांचे पाणी स्वच्छ होते. वाम, रव, कानोशी, कोळशी, शिंगाडे, लालपरे, आमळ्या, चालत, मरळ अशा प्रकारचे मासे आढळायचे. मात्र, नद्या प्रदूषित झाल्याने गेल्या दहा-बारा वर्षांत हे मासे नष्ट झाले आहेत. आता केवळ मांगूर व चिलापी हे मासे नद्यांमध्ये आढळतात. त्यामुळे वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत वन्यजीव अभ्यासक राजेश कांबळे यांनी व्यक्त केले. 

फुरसे सापडेना 
शहरात पूर्वी नाग, घोणस, फुरसे, मण्यार हे विषारी साप आढळायचे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून फुरसे आढळलेला नाही. नाग, घोणस, मण्यार यांची संख्याही कमी झालेली आहे. महापालिकेने सापांसाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यायला हवी, अशी अपेक्षा वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे यांनी व्यक्त केली.

परदेशी पक्ष्यांचा वावर...
संभाजीनगर येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पलगतच्या पाणथळ्यावर देशी पक्ष्यांसह युरोप व लगतच्या आशिया खंडातील देशातून स्थलांतरित झालेले पक्षी स्थिरावले आहेत. त्यांना मासे, पाणवनस्पती, गवत, मातीतील कीटक असे खाद्य व राहण्यासाठी गर्द झाडी उपलब्ध आहे. येथे माणसांना जाण्यास मनाई आहे, असे एका पक्षी मित्राने सांगितले.

नागरीकरणामुळे शहरातील नद्यांच्या परिसरात माणसांचा वावर वाढला आहे. त्याचा नद्यांमधील मासे, पक्षी अशा जीवसृष्टीवर तात्पुरता परिणाम झाला आहे. तो नैसर्गिक स्वरूपात आणण्यासाठी, मासे व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास कायमस्वरूपी जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com