डोबरवाडीमधील रस्ता  दहा दिवसांपासून बंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे : सोपान बाग येथील डोबरवाडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांच्या घरांवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली. त्यामुळे या नागरिकांनी तेथील रस्ताच मागील दहा दिवसांपासून बंद केला आहे. 
त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांना चार किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. 

पुणे : सोपान बाग येथील डोबरवाडीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अनधिकृतपणे राहणाऱ्या लोकांच्या घरांवर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली. त्यामुळे या नागरिकांनी तेथील रस्ताच मागील दहा दिवसांपासून बंद केला आहे. 
त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांना चार किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. 

मागील 40 वर्षांपासून साधारण शंभर घरे ही खासगी मालकाच्या जागेवर होती. या संदर्भात सुरू असलेला दावा जागामालकाने जिंकल्यानंतर ती घरे तोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. घरे तोडण्याआधी मोबदला मिळावा, यासाठी कारवाई दरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते, परंतु कडक पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. त्यामुळे या नागरिकांनी घरे तोडल्यानंतर घरातील सर्व साहित्य रस्त्यावर ठेवले. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. 

सोपान बाग हा परिसर अत्यंत उच्चभ्रू वर्गातील नागरिकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. मगरपट्टा, उदयबाग, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी गाव, लष्कर परिसराला जोडणारा हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांना तीन ते चार किलोमीटर अंतर जादा प्रवास करावा लागत आहे. या परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांना यांमुळे पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. 

""सोपान बाग रहिवासी मंचच्या वतीने हा रस्ता बंद ठेवण्याच्या विरोधात पोलिसांत आणि महापालिकेकडे तक्रार केली आहे, परंतु त्यांनी अजून सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.'' 
- सचिन खंडेलवाल, सदस्य 
-------------------- 

""फक्त एकवीस घरांवरच कारवाई करायला हवी होती, परंतु संपूर्ण वस्तीतील शंभरपेक्षा जास्त घरांवर कारवाई केली. घर किंवा मोबदला दिला नाही, त्यामुळे हा रस्ता बंद केला आहे.'' मारुती भद्रावती, स्थानिक रहिवासी. 
------------------ 

""या कारवाईत महापालिका सहभागी नव्हती. याविषयी सर्व न्यायालयीन बाजू तपासून आम्ही योग्य ती कारवाई करू. महापालिकेच्या वकिलांकडे हा विषय दिला असून त्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते पाऊल उचलले जाईल.'' - संजय गावडे, सहायक आयुक्त, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय 
----- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road are closed last ten days in Dobarwadi