सायरन वाजताच रस्ता मोकळा...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच विधान भवनाचा परिसर अवघ्या काही क्षणांमध्ये मोकळा करून संविधान सन्मान मूकमोर्चातील सहभागी नागरिकांनी माणुसकीचे दर्शन रविवारी घडविले.

पुणे - रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज येताच विधान भवनाचा परिसर अवघ्या काही क्षणांमध्ये मोकळा करून संविधान सन्मान मूकमोर्चातील सहभागी नागरिकांनी माणुसकीचे दर्शन रविवारी घडविले.

संविधान मूकमोर्चात सहभागी नागरिक दुपारी दीडच्या सुमारास विधान भवनाच्या परिसरात जमा होऊ लागले होते. त्याच वेळी संपूर्ण परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. अशा वेळेत रुग्णाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका या मार्गावर आली. रुग्णवाहिकेचा सायरनचा आवाज ऐकून प्रचंड संख्येने जमलेल्या या जनसमुदायाने वेगाने हालचाली करून या रुग्णवाहिकेला वाट करून दिली.

या घटनेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पुन्हा दुसरी रुग्णवाहिका आली. त्यालाही तितक्‍याच तातडीने पुन्हा मार्ग मोकळा देण्यात आला. या जनसमुदायामध्ये लहान मुले होती, ज्येष्ठ महिला आणि अपंग नागरिक होते. पण, त्यांनी या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वयंस्फूर्तीने रुग्णवाहिकेला जागा दिली.

या मोर्चाच्या दरम्यान तीन वेगवेगळ्या रुग्णवाहिका मार्गावरून गेल्या. या प्रत्येक वेळी मोर्चातील नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे यात सहभागी नागरिकांनी सांगितले.

Web Title: Road cleared for Ambulance