मांजरीमध्ये रस्त्याची दुरावस्था

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 7 जून 2018

मांजरी - येथील मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून, वाहनांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचा हा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याची मागणी होत आहे.

मांजरी - येथील मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असून, वाहनांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचा हा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याची मागणी होत आहे.

मांजरीतील महादेवनगर - मांजरी या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गेली वर्षभरापासून सुरु आहे. हे काम सध्या महादेवनगर या गजबजलेल्या परिसरात सुरु आहे. रस्त्यामध्ये येणारी अतिक्रमणे, पर्यायी मार्गाची वाणवा, सुरक्षित वाहतुकीच्या नियोजनाबाबत होणारे दुर्लक्ष व सध्याच्या रस्त्याची दुरवस्था यामुळे पावसाळ्यात येथील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या याच कामामुळे येथे वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. आगोदरच रुंदीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच चौरंग स्मितशिल्प व अण्णासाहेब मगर महाविद्यालया समोर जलवाहिनीच्या दुरवस्थेमुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गणेश व दुर्गामाता मंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झालेली आहे. या खड्यातून प्रवास करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. तक्रार करुनही आजपर्यंत त्याची दुरुस्ती होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी रुंदीकरणात येणारे विद्युत खांब अद्यापही काढण्यात आलेले नाहीत.  त्यामुळे नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे. गोपाळपट्टी, दरडी, चिलई वस्ती येथून सोलापूर महामार्गाकडे जाणारा रस्ताही ड्रेनेज लाईनच्या कामामुळे सध्या दुरवस्थेत आहे. घुलेवस्ती ते पंधरानंबर पर्यंत वाहणाऱ्या जुन्या कालव्यावरील रस्ता विकसित केलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून येथे काहिही नियोजन झालेले दिसत नाही. 

रस्त्यांची परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या पावसाळ्यात वाहतुकीचा मोठा बोजवारा उडल्याशिवाय राहणार नाही. वाहतूक कोंडी व छोटेमोठ्या अपघातांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने मुख्य रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजविण्याचे, रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाचे तसेच पर्यायी रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. तयार झालेल्या मुख्य रस्त्यासह मुळ रस्त्यावर वाढलेली अतिक्रमणेही काढणे आवश्यक झाले आहे.

"मुख्य रस्त्याच्या कामाबरोबरच जुन्या रस्त्याने होणारी वाहतुक सुरक्षित ठेवण्याचे काम बांधकाम विभागाचे आहे. खड्डे व अतिक्रमणांमुळे गेली काही महिन्यांपासून वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात महादेवनगर परिसरात प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. प्रशासनाने त्याबाबत गांभीर्याने घ्यावे.''
एक प्रवासी

"पावसाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती टाळण्यासाठी घुलेवस्ती ते मगर बँकेपर्यंतचे काम जलद पूर्ण करून घेण्यात येत आहे. जुन्या मार्गावरील वाहतूक अडली जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. कालव्यावरूनही पर्यायी वाहतुक व्यवस्था केली आहे.''
नकुल रणसिंग सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

Web Title: Road Deterioration in manjari