रस्त्यांआधी पदपथच केले रुंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे - महापालिकेकडून कायदा धाब्यावर बसवून कामे केली जात असल्याचे समोर आले आहे. विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते रुंद न करता त्याच रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. भविष्यात रस्ता रुंद करताना पदपथ रुंदीकरणावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे - महापालिकेकडून कायदा धाब्यावर बसवून कामे केली जात असल्याचे समोर आले आहे. विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेले रस्ते रुंद न करता त्याच रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. भविष्यात रस्ता रुंद करताना पदपथ रुंदीकरणावर होत असलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने जानेवारी २०१७ मध्ये मान्यता दिली. या विकास आराखड्यात शहराच्या हद्दीतील रस्त्यांचे रुंदीकरण प्रस्तावित होते. सरकारने याला सरसकट मंजुरी न देता गावठाण हद्दीतील रस्तारुंदी रद्द केली. यात शहरातील इतर रस्त्यांचे रुंदीकरण कायम राहिले आहे. महाराष्ट्र नगर रचना अधिनियमातील तरतूद ३१ प्रमाणे विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे. शहरातील सर्वाधिक वाहतूक असलेल्या काही रस्त्यांचा त्यामध्ये समावेश आहे. एवढेच नव्हे, तर विकास आराखड्यातील नकाशावरदेखील या रस्त्यांचे रुंदीकरण दर्शविण्यात आले आहे. 

आता या रस्त्यांचे रुंदीकरण न करताच त्यावरील पदपथ मोठे करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून दिवसाढवळ्या कसे काय होत आहे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पदपथ मोठे करण्यात आल्याने रस्त्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. भविष्यात या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले पदपथ तोडावे लागण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात महापालिकेच्या पथविभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

भांडारकर रस्त्यावर हाच प्रकार 
भांडारकर रस्त्याची सध्याची रुंदी ही १५ मीटर एवढी आहे. प्रत्यक्षात या रस्त्यांची रुंदी काही ठिकाणी तेवढीदेखील भरत नाही. सरकारने जानेवारी २०१७ मध्ये मान्यता दिलेल्या विकास आराखड्यात या रस्त्याची रुंदी २० मीटर दर्शविण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण न करता महापालिकेने या रस्त्यावर पदपथ रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे.

अतिक्रमणास चालना मिळण्याची संधी
रस्ता रुंदीकरण न करता त्या रस्त्यावरील पदपथाचे रुंदीकरण करण्याच्या महापालिकेच्या उलट्या धोरणामुळे त्या रस्त्यावरील एखादी मिळकत पुनर्विकासाठी आल्यास त्यांना पुढील जागा मोकळी सोडावी लागेल. यामुळे त्या इमारतीपुरतेच त्या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने रस्ता वाकडातिकडा होणार आहे. त्या इमारतीच्या पुढील जागा मोकळी आणि पदपथ यामध्ये अंतर राहणार असल्याने भविष्यात तेथे अतिक्रमणांना चालना मिळण्याची शक्‍यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

विकास आराखड्यामध्ये अनेक रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियादेखील सुरू आहे; परंतु ती पूर्ण होईपर्यंत थांबण्याऐवजी नागरिकांना सोयीसुविधा देणे गरजेचे आहे. रुंदीकरणाच्या जागा ताब्यात आल्यानंतर तेथे नागरिकांना अन्य सुविधा देता येऊ शकतात.
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Road Footpath Development Issue