रस्ते झाले खड्डेमय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

‘सकाळ’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली. पिंपरीतील रहदारीच्या रिव्हर रस्त्यावर भाटनगर कॉर्नरला तीन ते चार मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोटे-मोठे अपघात होतात. पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय ते पिंपरीगाव या रस्त्यावर एका बाजूला खडी पसरली आहे. तसेच, सांडपाणी नलिकेसाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे येथून वाहने चालवताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. चिंचवड स्टेशन येथील रेल्वे उड्डाण पूल ते चिंचवडगाव या रस्त्यावर पुलाच्या उतारावर खड्ड्यातून वाटचाल करत वाहन चालवणे जिकिरीचे ठरते. 

थरमॅक्‍स चौक ते यमुनानगर रस्त्यावर दुर्गानगर झोपडपट्टीजवळ रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. त्रिवेणीनगर ते तळवडे, यमुनानगर चौक ते त्रिवेणीनगर चौक, त्रिवेणीनगर ते साने चौक (चिखली), त्रिवेणीनगर चौक ते भक्ती-शक्ती उद्यान चौक (निगडी) या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. साईनाथनगर ते यमुनानगर येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यमुनानगर येथील अमृतानंदमयी शाळेसमोर असलेल्या रस्त्यावरदेखील खड्डे पाहण्यास मिळाले. निगडी-टिळक चौक येथील उड्डाण पुलापासून बजाज ऑटो (आकुर्डी) प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला खडी टाकलेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. कासारवाडी येथे भुयारी मार्गाजवळ खड्डे पडले आहेत.

त्यामुळे पुण्यावरून नाशिक फाट्याकडे येणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होत आहे. काळेवाडी येथील तापकीर चौक ते रहाटणीतील गोडांबे चौकदरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे आणि चिखल साचल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. आकुर्डीतील खंडोबामाळ चौक, दत्तवाडी, अजंठानगर येथील रस्त्यांवरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

विविध भागांमध्ये खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोटारसायकल चालविताना खूप त्रास होतो. पावसाचे पाणी साचल्यानंतर खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पालिकेने खड्डे तातडीने बुजवायला हवे. 
- कुंदन चव्हाण, नागरिक

महापालिकेतर्फे जेट पॅचर तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवर पडलेले खड्डे भरले जात आहेत. सध्या तीन मशिनच्या माध्यमातून ‘अ’, ‘ब’, आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हे काम सुरू आहे. पावसाची थोडी उघडीप मिळाल्यानंतर ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजविण्यात येतील. 
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग

Web Title: road hole rain accident