पावसाने उडवली हडपसर-मांजरी परिसरातील रस्त्यांची दाणादाण

कृष्णकांत कोबल
सोमवार, 16 जुलै 2018

काल रात्रीपासून होत असलेल्या संततधार पावसाने हडपसर- मांजरी परिसरातील रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साठली असून त्यामुळे वाहतूकीला अडचण होत आहे.

मांजरी : काल रात्रीपासून होत असलेल्या संततधार पावसाने हडपसर- मांजरी परिसरातील रस्त्यांची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साठली असून त्यामुळे वाहतूकीला अडचण होत आहे.

पावसाळी गटारांच्या देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनही थोड्याच पावसात झालेल्या वाताहतीने या कामांचा दर्जा दाखवून दिला आहे. सोलापूर रस्ता, मांजरी रस्ता, सिरम कंपनी रस्ता आदी ठिकाणची नादुरुस्त गटारे, खचलेले रस्ते आणि उलटलेली गटारे यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झालेली आहेत.

मांजरी फाट्यावरून अण्णासाहेब मगर महाविद्यालयापर्यंतच्या करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणच्या रस्त्यावर निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी घाण पाण्याची तळी साचली आहेत. यातून मार्ग काढतांना पादचारी आणि नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी संपूर्ण भागात पावसाळीपूर्व कामे केली जातात. यामध्ये ओढे- नाले, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधील गाळ, कचरा काढणे, रस्ते, फुटपाथ दुरुस्ती आदी विविध स्वरूपाची कामे केली जातात. यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च देखील केला जातो. मात्र, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की महापालिका प्रशासनाकडून केलेल्या पावसाळ्यापूर्वीच्या या निकृष्ट कामांचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात.

दरवर्षीप्रमाणे, याही वेळी पावसाळापूर्व कामांनी पालिकेचे पितळ उघडे पाडले आहे. पंधरा नंबर फाटा, मांजरी रस्त्यावरील मनिरत्न  आंगण सोसायटी व आण्णासाहेब मगर महाविद्यालया प्रवेशद्वारासमोरील रस्ता, रविदर्शन चौक, सिरम रस्ता, डीपी रस्ता आदी ठिकाणी सांडपाणी वाहिनी व पावसाळी गटारांची दुरवस्था झाली आहे. 

महापालिका प्रशासनाकडून सिमेंट रस्त्यांवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना,  रस्त्यांवर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाळी गटाराची सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवरूनच वाहत असल्याने सर्व रस्ते जलमय झाले होते.

Web Title: road problems in rainy season in hadapsar manjri