महिलेला दमदाटी करणारे रोडरोमिओ अखेर गजाआड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

गोकुळनगर : जवानाच्या पत्नीला उडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सोसायटीत घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या चार रोडरोमिओंना अखेर सोमवारी (ता. 31) गजाआड करण्यात आले. 

गोकुळनगर : जवानाच्या पत्नीला उडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सोसायटीत घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या चार रोडरोमिओंना अखेर सोमवारी (ता. 31) गजाआड करण्यात आले. 

गोकुळनगर येथील अरिहंत प्रथमेश सोसायटीत राहाणाऱ्या वर्षा कुरे यांना चारचाकी वाहनाद्वारे उडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओंना कोंढवा पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले, की महादेव अशोक सुरगुडे (वय,22), योगेश नामदेव नरवडे (वय,21), प्रितम पोपटलाल चानोदिया (वय, 28) आणि शुभम अरूण सरगुडे(वय,21, सर्वजण रा. बालाजीनगर) असून त्यांच्यावर कलम 107 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये शनिवारी (ता. 29) प्रसिद्ध झाले होते.

वर्षा कुरे या गुरुवारी रात्री आपल्या दुचाकी वाहनाने मुलीसह घराकडे परतत असताना चारचाकी वाहनातून जाणाऱ्या चार टारगट मुलांनी हा गैरप्रकार केला. त्याचा जाब विचारल्याबद्दल कुरे यांना थेट सोसायटीमध्ये जाऊन, मारण्याची धमकी दिली. कुरे यांनी कोंढवा पोलिसांकडे तातडीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत कोणतीही कारवाई न केल्याने निष्क्रियतेबद्दल या परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. 

"सकाळ'मुळे हिंमत मिळाली: वर्षा कुरे 

याबाबत बोलताना वर्षा कुरे म्हणाल्या, माझे पती देश रक्षणासाठी सैनिकात नोकरी करतात. दमदाटीमुळे मलाच असा मनस्ताप झाला. इतर महिलांनाही अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असेल. पोलिसांनी चोवीस तासांत दखल न घेतल्याने मी "सकाळ' कडे धाव घेतली आणि "सकाळ'ने दखल घेतल्यामुळे मला आज थोडाफार न्याय मिळाला. "सकाळ'मुळे मला हिंमत मिळाली आहे.

Web Title: Road Romio Arrested in Pune