रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

पुणे - वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक बळकट झाली तरच शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होईल. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे, असे मत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले. 

पुणे - वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक बळकट झाली तरच शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होईल. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करुन प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे, असे मत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केले. 

जिल्हा रस्ता सुरक्षा कमिटी, परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस शाखेच्यावतीने गेल्या पंधरा दिवसांपासून सुर असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा सोमवारी पोलीस मुख्यालय येथे समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, सह आयुक्त रविंद्र कदम, वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आदी उपस्थित होते. 

राव म्हणाले, ""अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा उत्तम पर्याय आहे. तसे केल्यास रस्त्यावरील खाजगी गाड्या कमी होऊन अपघातही घटतील. वाहतूक पोलिस सर्वसामान्यांसाठी उन्हातान्हामध्ये चौकांमध्ये उभे असतात. तेच समाजातीर खरे हिरो आहेत.'' 

शुक्‍ला म्हणाल्या, ""सुट्ट्यांच्या काळातही विद्यार्थ्यांनी या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. पंधरा दिवसामध्ये वाहतूक पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता सुरक्षिततेवर भर देऊन जनजागृती घडविली.'' खासदार शिरोळे यांनी ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सुधारणा करण्याचे तसेच मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली जात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मोराळे यांनी केले. 

एक कोटी रुपयांचा दंड 
रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत मागील पंधरा दिवसांमध्ये 25 हजार जणांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेटचा वापर न करणे, वेगात गाडी चालविण्यापासून ते मोबाईलवर बोलण्यासारख्या अनेक कारणांमुळे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

वाहतूक पोलिसांसाठी 100 कूलिंग जॅकेट 
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने शहराच्या विविध भागातील चौकांमध्ये वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या वाहतूक पोलिसांना या वेळी शंभर कूलिंग जॅकेट देण्यात आली. नागपूरपाठोपाठ पुण्यातील पोलिसांना कूलिंग जॅकेट उपलब्ध झाली आहेत. 

Web Title: Road safety week finish