‘यम हैं हम’ने सभागृह दणाणले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - बहारदार सादरीकरण, रस्ता सुरक्षा नियमांचा खणखणीत संदेश अन्‌ युवकांचा जल्लोष... अशा वातावरणात उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या पथनाट्य स्पर्धेमध्ये बाजी मारली ती येरवड्याच्या गेनबा सोपानराव मोझे महाविद्यालयाने. दोन संघांनी यम देवतेला कथेच्या केंद्रस्थानी ठेवल्याने ‘यम हैं हम, हम हैं यम’ या डायलॉगने सभागृह दणाणले. आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या मोहिमेत युवकांचा असाही सहभाग लाभल्याने वाहतूक पोलिस खात्याचा हुरूपदेखील वाढला.

वाहतूक शाखेच्या २८व्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालयाने द्वितीय, तर कोथरूडमधील न्यू इंग्लिश स्कूल आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. अपर पोलिस आयुक्त शशिकांत शिंदे, पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, कल्पना बारावकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे डॉ. शरद कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष आनंद पानसे, पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील आणि ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार हे स्पर्धेचे परीक्षक होते.

मूकनाट्याच्या माध्यमातून वाहतूक प्रश्‍नावर भाष्य करणाऱ्या विश्रांतवाडीतील इमॅन्युअल स्कूलला उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर गरवारे प्रशालेच्या गौरव दरेकर आणि स. प. महाविद्यालयाच्या स्नेहल घोलप

यांना अभिनयाबद्दल वैयक्तिक बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत झील महाविद्यालय (दत्तवाडी), आचार्य आनंदऋषी इंग्रजी माध्यम शाळा (पिंपरी-चिंचवड), विमलाबाई गरवारे प्रशाला, मॉडर्न महाविद्यालय ऑफ फार्मसी (निगडी), महर्षी स्त्री शिक्षण संस्था (वारजे माळवाडी) या संघांनीही भाग घेतला होता. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रीती टिपरे यांनी आभार मानले.

‘हेल्मेट वापरा’चा संदेश
वाहन चालवताना सेल्फी काढू नका, हेल्मेट न विसरता वापरा, सीट बेल्ट बांधा, दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करू नका, झेब्रा क्रॉसिंगला थांबा, दारू पिऊन गाडी चालवू नका... अशा वेगवेगळ्या नियमांना कथेची जोड देऊन विद्यार्थ्यांनी ते पथनाट्याच्या माध्यमातून सादर केले. विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले, विचार करायला लावले आणि डोळ्यांत पाणीही आणले.

शहरातील वाहतुकीची समस्या आपल्याला सोडवता येऊ शकते. त्यासाठी तरुणांनी पोलिसांना मदतीचा हात द्यावा. असे झाले तर ‘पुण्यातील वाहतूक येऊन बघा’, असे आनंदाने इतरांना म्हणता येईल.
- शशिकांत शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त

Web Title: road show competition result