आंबेठाण परिसरातील नागरिकांनो, वासुली फाटा रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी 

रुपेश बुट्टेपाटील 
Wednesday, 28 October 2020

वासुली फाटा (ता. खेड) येथील दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

आंबेठाण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणारा परंतू बहुतांश वापर एमआयडीसीत येणाऱ्या वाहनांचा असणाऱ्या चाकण-वांद्रा या मुख्य रस्त्यापैकी वासुली फाटा (ता. खेड) येथील दुरवस्था झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शासनाच्या हायब्रीड anuti योजनेतून हे काम मार्गी लागणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता संतोष पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भांबोली ग्रामपंचायत हद्दीतील शिवछत्रपती चौक ते मुख्य वासुली फाटा या जवळपास ५०० मीटर अंतराचे नूतनीकरण आणि रुंदीकरण केले जाणार आहे.यात दुतर्फा गटारे केली जाणार असून, रुंदी जवळपास सात ते दहा मीटर ठेवण्याचे प्रयोजन आहे. याकामी स्थानिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. अवघ्या काही अंतराचा हा रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयाअभावी नागरिकांना जीवघेणा ठरत होता.

या ठिकाणी ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिक यांनी बऱ्याच वेळा मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीचा प्रयत्न केला होता परंतु मोठ्या वर्दळीच्या मानाने त्यांचे प्रयत्न तोकडे पडत होते.काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली होती.पावसाळ्यात तर रस्त्यावर सततचे गुडघाभर पाणी व चिखलामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यावसायिक, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

वासुली फाटा ही चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील मुख्य बाजारपेठ असून तळेगाव एमआयडीसीकडे जाण्यासाठी सध्या तरी येथूनच जावे लागत आहे. दळणवळणाचा हा मुख्य मार्ग असल्याने हा रस्ता सतत गजबजलेला असतो.रस्त्याच्या दुतर्फा दुकाने व भाजीपाला मार्केट आहे.त्यामुळे इथे नागरिकांची व वाहनांची सततची रेलचेल असते. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्थानिक जागा मालकांनी व्यापारी गाळे उभारले असून, हे गाळे मुरुमाचा भराव टाकून मुख्य रस्त्यापासून अधिक उंच केले आहेत. त्यांच्यातील या व्यावसायिक स्पर्धेत रस्त्याला खोलगटपणा आलेला होता. येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या मोऱ्या बुजून गेल्या आहेत. उन्हाळ्यात रस्त्यावर खड्ड्याची चाळण, दगड-गोटे व धूळमातीमुळे श्वसनाच्या आजाराला सामोरं जावे लागते तर पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्याचे अक्षरशः तळे साचते. रस्त्याला ना साईड गटर ना पाणी वाहून जाण्यासाठी मोरी आहे त्यामुळे चोहोबाजूंनी पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भांबोली ग्रामपंचायत व स्थानिक व्यावसायिकांनी  वेळोवेळी मुरुमाने रस्त्यावरील खड्डे भरुन घेतले होते. या कामासाठी भांबोली ग्रामपंचायतीने मागणी केली होती तर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर यशस्वी पाठपुरावा करीत यंत्रणा हलविली होती.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road at Vasuli Fata will be repaired soon