रस्ते, वाहने, दुभाजकांची होणार पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

पुणे - वर्दळीच्या रस्त्यांची स्थिती, वाहनांचे प्रमाण, त्यावरील दुभाजक आणि त्यांच्या सद्यःस्थितीची पाहणी करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. वर्दळीच्या रस्त्यांवरील दुभाजकांची पुनर्रचना करण्याबाबत धोरणे ठरविण्याच्या हालचालीही करण्यात येत आहेत.

पहिल्या टप्प्यात बाणेर-बालेवाडी, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्याची पाहणी करून प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. 

शहरातील विविध भागातील रस्त्यांवरील वाहतूक वाढली असतानाही रस्ता दुभाजक नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर काही भागात दुभाजक म्हणून केवळ ‘ब्लॉक’ ठेवले असून, वर्दळीच्या कर्वे रस्त्यावरील जेमतेम एक फूट उंचीचे दुभाजक जीवघेणे ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाणेर-बालेवाडी रस्त्यावरील भीषण अपघातालाही येथील दुभाजकच कारणीभूत असल्याचे आढळले आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध रस्त्यांवरील दुभाजक केवळ नावापुरतेच असल्याचे त्यांच्या स्थितीवरून दिसून आले आहे. 

मुळात, रस्त्यांवर दुभाजक उभारण्याबाबतचे धोरण महापालिका प्रशासनाने ठरविलेले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे ज्या पद्धतीचे दुभाजक आहेत, तेच कायम ठेवले आहेत. काही भागातील रस्त्यांवर दुभाजकांना रंग लावलेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना दुभाजक दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर वर्दळीचे रस्ते, त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण आणि आणि दुभाजकांच्या स्थितीची पाहणी करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  

महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘शहरातील रस्त्यावर दुभाजक उभारण्याबाबत धोरण ठरविण्यात आलेले नाही; परंतु वाहनचालक, पादचारी यांच्या सुरक्षिततेसाठी दुभाजकाबाबत नव्याने काही नियम ठरविता येतील का, याची पाहणी करण्यात येईल. त्यानुसार बदलाचे नियोजन करू.’’

Web Title: road, vehicle, divider cheaking