सततच्या पावसामुळे  रस्ते खड्डेमय 

khadki.jpeg
khadki.jpeg

पुणे ः: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकी, औंध, बोपोडी, पाटील इस्टेट परिसर, मुळा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे चुकवत मार्गक्रमण करताना वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. महापालिकेच्या पथ विभागाने सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी ते पाटील इस्टेट, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप ते मुळा रस्ता, तसेच बोपोडी सिग्नल चौक ते खडकी बाजारपर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. 
गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, डांबर वाहून गेल्यामुळे खडी सर्व रस्त्यांवर अस्ताव्यस्त पसरली आहे. खडीवरून दुचाकी घसरून अनेक ठिकाणी छोटेमोठे अपघात होण्यास सुरवात झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अचानक ब्रेक मारल्यामुळे मागील वाहने धडकण्याचे सत्र सर्वत्र सुरू आहे. 

काही ठिकाणी महापालिकेकडून तात्पुरती रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे, मात्र पाऊस सतत सुरू असल्यामुळे डांबर व खडी काही वेळानंतर निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खडी पसरत आहे. 

खडकी रेल्वे स्टेशन ते औंध रस्त्यावरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडण्याचे प्रकार घडत आहे. पुणे मुंबई मार्गावरून रेंजहिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दोन्ही रेल्वे पुलाखाली तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहने संथ गतीने सुरू असून, पुलाखालून एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबवर रांगा लागत आहे. त्याचा ताण पुणे-मुंबई मार्गावरील अंडी उबवणी चौक व खडकी पोलिस ठाणे चौकावर पडत आहे. परिणामी खडकी, बोपोडी वाकडेवाडी येथील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 

मुळा रस्त्याची चाळण 

खडकी ः मुळा रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. येथील खड्ड्यांबाबत "सकाळ'ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करत आवाज उठवला होता. त्याची दखल घेत रस्ते विभागाने वीस दिवसांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरणही केले होते, मात्र पावसामुळे रस्त्यावरील डांबर निघाले असून, खडी पसरली आहे. सध्या पावसाळा सुरू आहे तोपर्यंत डांबराचा पॅच देण्यात येणार असून, त्यानंतर कायमस्वरूपी सिमेंट कॉंक्रिटीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेचे उपअभियंता के. पी. निम्हण यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे डांबरीकरणही झाले. मात्र पावसामुळे वीस दिवसांत पुन्हा या रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकासंह स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. 
मुळा रस्ता सर्कल परिसरात रस्त्यावर टाकण्यात आलेले ब्लॉक्‍स निघाल्याने त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने पाणी साचले आहे. त्यामुळे अपघाताची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com