इलेक्‍ट्रॉनिक्सचे दुकान फोडून 25 लाखांच्या वस्तू चोरणाऱ्या टोळीस अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुणे : बुधवार पेठेतील एका इलेक्‍ट्रॉनिक वस्तुंचे गोडाऊन फोडुन तब्बल 25 लाख रुपयांच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तु चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीस लाख साठ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

पुणे : बुधवार पेठेतील एका इलेक्‍ट्रॉनिक वस्तुंचे गोडाऊन फोडुन तब्बल 25 लाख रुपयांच्या इलेक्‍ट्रॉनिक वस्तु चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून तीस लाख साठ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. 

अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज (वय 20), विनयकुमार विरेंद्रनारायण सरोज (वय 20), राहुल रामसजीवन सरोज (वय 20), निरजकुमार मेघाई सरोज (वय 19), सुनिलकुमार शामसुंदर सरोज (वय 24), अरविंदकुमार प्यारेलाल सरोज (वय 20, सर्व सध्या रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी व मंगळवार पेठ, मुळ रा, उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिपक रमेश वाधवानी (रा.साधु वासवानी चौक) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

बुधवार पेठेमध्ये फिर्यादी यांचे इलेक्‍ट्रॉनिक दुकान असून दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरच इलेक्‍ट्रॉनिक वस्तु ठेवण्याचे गोडाऊन आहे. त्यांचे गोडाऊन सहा ते आठ जुलै रोजी बंद असताना चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीची फ्रेम तोडून 24 लाख 60 हजार रुपयांच्या वस्तु चोरुन नेल्या होत्या. या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाकडूनही सुरु होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यासाठी वापरलेला टेम्पो पोलिस उपनिरीक्षक दिनेश पाटील, पोलिस कर्मचारी योगेश जगताप, सुधाकर माने यांना सापडला. चालकास विचारणा केल्यानंतर त्यांनीच उत्तरप्रदेशामधील त्याच्या अन्य साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेल्या वस्तुंसह टेम्पोही जप्त केला. सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाटील, उत्तम बुदगुडे, हनुमंत माने, पोलीस कर्मचारी रिजवान जिनेडी, श्रीकांत वाघवले, तुषार खडके यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

गुन्ह्यासाठी टेम्पोची रंगरंगोटी ! 
आरोपी विनयकुमार हा फिर्यादीच्या दुकानामध्ये एक वर्षापुर्वी कामाला होता. त्यास गोडाऊनची संपुर्ण माहिती असल्याने त्यानेच चोरीचा कट रचला. चोरीसाठी टेम्पोचा रंग, नंबर प्लेट बदलली. चोरी करुन झाल्यानंतर आरोपींनी टेम्पोस पुन्हा मुळ नंबरप्लेट व रंग दिला. त्यामुळे पोलिसांना टेम्पोचा शोध घेणे जिकीरीचे गेले. दरम्यान आरोपींनी चोरलेल्या वस्तुंची विक्री करण्यास सुरूवात केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robbers arrested who stoles 25 lakhs from electronic shop in Pune