दिवसाढवळ्या चोरी करणारे अट्टल चोरटे गजाआड

प्रा. प्रशांत चवरे
सोमवार, 20 मे 2019

भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले

भिगवण : भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून भिगवण पोलिसांनी गजाआड केले. दोघांवर भिगवण, बारामतीसह जिल्ह्यामध्ये दिवसाढवळ्या बंद सदनिका फोडून चोरीचे वीस गुन्हे दाखल आहे. चोरट्यांकडुन चोरीची आणखीही प्रकरणे उघड होण्याची शक्यता भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी व्यक्त केली आहे.

शशिकांत आनंत माने(वय.२२ रा.मांजरी फार्म,ता.हवेली) अमोल अर्जुन गोरे (वय.२४ रा. राजयोग कॉलनी आकुर्डी) अशी या अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरटयांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटार सायकल, चोरीसाठी वापलेली सायकल स्टँड, अठरा तोळे सोने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहीती अशी, थोरातनगर परिसर येथील तीन सदनिका (ता. ८ मे ) दिवसाढवळ्या फोडुन चोरटयांनी आठरा तोळे सोने व रोख रक्कम चोरली होती. चोरटयांनी मागे कोणताही पुरावा सोडला नव्हता. शेवटी भिगवण पोलिसांनी भिगवण पोलिस स्टेशन हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.  त्यामध्ये पल्सर मोटार सायकलवरुन दोन तरुण संशयितरित्या फिरताना आढळुन आले. सदर संशयित व्यक्ती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशने गेल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी भिगवण ते पुण्यापर्यंतच्या ४२ ठिकाणीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर चोरटे हे मांजरीपर्यंत (ता.हवेली) आल्याचे आढळुन आले. त्यानंतर खबऱ्यामार्फत आरोपींचा माग काढत शशिकांत माने यास मांजरी येथून तर अमोल गोरे यास आकुर्डी येथुन ताब्यात घेतले. आरोपींनी भिगवण व बारामती येथील चोरीची कबुली दिली असुन आरोपींवर यापु्र्वीही विविध पोलिस ठाण्यामध्ये चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. 

अट्टल चोरटयांच्या मुसक्या आवळण्यासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस हवालदार सचिन जगताप, श्रीरंग शिंदे, रमेश भोसले, बापु हडागळे यांनी विशेष परिश्रण घेतले. सदर गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदीप पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश ढवाण करीत आहेत.

दिवसाढवळ्या चोरीचे सत्र थांबण्याची आशा
भिगवण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मागील महिन्यामध्ये चार ते पाच ठिकाणी दिवसाढवळ्या सदनिका फोडुन चोरटयांनी मोठी रक्कम चोरुन नेल्याच्या घटना घटल्या होत्या. दिवसाच्या चोऱ्यांमुळे नागरिकांसह पोलिसही हादरुन गेले होते. भिगवण पोलिसांनी चिकाटीने केलेला तपास व आरोपींच्या मुसक्या आवळल्यामुळे दिवसा होणाऱ्या चोऱ्या थांबतील म्हणुन नागरिकांनी सुटकेचा निश्वाःस टाकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbers get arrested