स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून घातला दरोडा 

प्रफुल्ल भंडारी
गुरुवार, 5 एप्रिल 2018

दौंड : बेटवाडी फाटा (ता. दौंड) येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबई येथील एका प्लॅस्टिक पॅकेजिंग करणाऱ्या उद्योजकाकडील १ लाख १७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. 

दौंड : बेटवाडी फाटा (ता. दौंड) येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबई येथील एका प्लॅस्टिक पॅकेजिंग करणाऱ्या उद्योजकाकडील १ लाख १७ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. 

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार गोपाल ओमासे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदेश महादेव चव्हाण (वय ३३, रा. मालाड, मुंबई) असे फसवणूक झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. उदेश चव्हाण याचा मित्र सत्यमकुमार सुरेंद्रकुमार गोसावी (वय २१, रा. खारवाडी, मुंबई) याने उदेश यास दीपक नावाच्या इसमाकडे एक किलो सोने असून, तो हे सोने दहा हजार रूपये तोळे या दराने द्यायला तयार असल्याचे सांगितले होते. या आमिषाला बळी पडून, मोबाईल वरून संपर्क झाल्यानंतर उदेश व सत्यमकुमार हे ४ एप्रिल रोजी सकाळी दौंड - पाटस रस्त्यावरील बेटवाडी फाटा येथे स्वस्तातील सोने घेण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख एक लाख रूपये, दोन मोबाईल व सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख १७ हजार रूपयांचा ऐवज घेऊन दीपक याच्यासह त्याचे सात साथिदार उसाच्या फडात पळून गेले. चाकूचा धाक दाखवून मारहाण करणारऱ्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

दौंड पोलिसांनी उदेश चव्हाण याच्या फिर्यादीनुसार सात अज्ञात लोकांविरूध्द दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फौजदार संजय नीलपत्रेवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The robbery betrayed the price of cheap gold