Pune Crime : खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery firing village khed Shivapur Three unknown person stole four lakh rupees police

Pune Crime : खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत लूट

खेड-शिवापूर : दारू दुकानातील दारू विक्रीची रक्कम घेऊन निघालेल्या कामगारांवर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी गोळीबार करून त्यांच्याकडील सुमारे पावणेचार लाख रुपयांची रक्कम चोरून नेली. पुणे-सातारा रस्त्यावर खेड-शिवापूर येथे रविवारी (ता. १९) मध्यरात्री पावणेबारा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली की, खेड-शिवापूर गावच्या हद्दीत सोनल वाईन्स हे दारूचे दुकान आहे. या दुकानातील जमा झालेली दारू विक्रीची रक्कम घेऊन रविवारी रात्री दीपक जगदाळे आणि काळेश्वर आगारीया हे दुचाकीवरून कोंडे देशमुख पेट्रोल पंपावर निघाले होते. यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी दुचाकीने जगदाळे यांच्या दुचाकीला घासून खाली पाडण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जगदाळे आणि आगारीया यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणाला दुखापत झाली नाही. मात्र, जगदाळे आणि आगारीया यांच्याकडील सुमारे पावणेचार लाख रुपये रक्कम असलेली पिशवी घेऊन ते चोरटे पसार झाले. राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, ‘‘सुदैवाने एक गोळीबार चुकला आणि दुसरा गोळीबार हवेत झाला. त्यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. आरोपींचा शोध सुरू आहे.’’