एक कोटीचे दागिने लंपास करणारी टोळी जेरबंद 

poice-theft.jpg
poice-theft.jpg

पिंपरी : एक कोटीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बसमधून लंपास केलेल्या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
 

तब्बल तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर गुन्हे शोध शाखा आणि हिंजवडी ठाणे यांनी संयुक्तपणे मध्य प्रदेशमध्ये आठ दिवस तळ ठोकून ही कामगिरी केली. चोरीची ही घटना 14 फेब्रुवारीला पुनावळे येथे घडली होती. याबाबत उपायुक्त (परिमंडळ 2) विनायक ढाकणे यांनी दिलेली माहिती अशी : हैदराबाद येथील वीस व्यापाऱ्यांना सोने, हिऱ्यांचे दागिने आणि रोख रक्कम असे सुमारे एक कोटीचे पार्सल मुंबईला पाठवायचे होते. भवानी एअर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीकडे ही जबाबदारी दिली होती.

कर्मचारी दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय 24, रा. सिकंदराबाद, तेलंगण) हा एका आराम बसमधून पार्सल घेऊन निघाला होता. दरम्यान, बंगळूर-मुंबई महामार्गावरील कात्रज-देहूरोड बाह्यवळण दरम्यानच्या पुनावळे येथील एका हॉटेलसमोर बस थांबली. सर्व प्रवाशांबरोबरच सैनीसुद्धा जेवणासाठी उतरला. त्यावेळी पार्सलची पिशवी आपल्या सीटखाली कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने ठेवली. काही वेळाने जेवून आल्यावर पिशवी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याची घाबरगुंडी उडाली. नंतर त्याने हिंजवडी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली. 


गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. महामार्गावरील हॉटेल परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरट्यांची ओळख पटली. ही टोळी मध्य प्रदेशमधील इटावा (जि. देवास) या गावातील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संयुक्त पथक तयार करून इटावा येथे पाठविले. या पथकाने सलग आठ दिवस विविध ठिकाणी सापळा रचून, वेशांतर करून आरोपी मुश्‍ताक समशेर खान (वय 31, रा. इटावा जि. देवास), राजेंद्र हरिश्‍चंद्र सोनी (38) व इस्माईल बाबू खान (33, दोघेही रा. धार, मध्य प्रदेश) यांना पकडले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 25 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटासह 36 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी सात जणांची असून चौघे फरारी आहेत. या सर्वांनी हैदराबाद येथून पार्सलवर पाळत ठेवली होती. पुनावळे येथे अचूक जागा मिळाताच संधी साधल्याचे चोरट्यांनी सांगितले. 

यांनी केली कारवाई 
गुन्हे शाखा युनिट दोनचे निरीक्षक भानुदास जाधव, एकचे निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक हर्शल कदम, हिंजवडीचे उपनिरीक्षक अशोक गवारी यांच्यासह कर्मचारी नारायण जाधव, संजय गवारे, फारुख मुल्ला, मयूर वाडकर, संदीप ठाकरे, किरण आरुटे, प्रवीण दळे, हजरत पठाण, जमीर तांबोळी, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, महादेव जावळे, दत्तात्रय बनसोडे, संपत निकम, धर्मराज आवटे, महंमद गौस नदाफ, नितीन बहिरट, दादा पवार, धनराज किरनाळे, सावन राठोड, सचिन मोरे, राजेंद्र शेटे, महेंद्र तातळे, गणेश मालुसरे, दीपक खरात, प्रमोद हिरळकर, कुणाल शिंदे, अमर राणे, सुभाष गुरव, रेखा धोत्रे, विकी कदम व शिवथरे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com