कळंबला रात्रीत १४ घरे फोडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

महाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात बंद असलेल्या तब्बल १४ घरांत सोमवारी (ता. १५) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सर्व घरांची कुलपे तोडून एकूण सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदी व रोख ६५ हजार रुपये; तसेच एलईडी टीव्ही, इस्त्री आदी वस्तू चोरट्यांनी लांबविल्या. चोरट्यांनी मिळेल ते साहित्य घेऊन पोबारा केला आहे. भरवस्तीत चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  

कळंब येथील अलका सोपान भालेराव या रविवारी (ता. १४) रात्री चांडोली बुद्रुक येथे बंधूंकडे गेल्या होत्या. सकाळी गावात चोरी झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर त्या ताबडतोब घरी गणेशवाडी येथे आल्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, दोन तोळ्यांचे सोन्याचे वेल, अर्धा तोळ्याची अंगठी, नथ, देवीचा चांदीचा गाठा, पाच हजार रुपयांची चिल्लर व शेतीमाल खरेदी करण्यासाठी आणलेले ५० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. कपाटातील साडीमध्ये असलेले पाच हजार रुपये सुरक्षित राहिले आहेत. 

दशरथ भालेराव यांच्या घरातील कपाट फोडून रोख नऊ हजार रुपये, एक तोळा वजनाच्या सोन्याच्या कुड्या, ठुशी असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला आहे. शंकर किसन भालेराव यांच्या घरातून पीठ, साखर व ४०० रुपये, संतोष भालेराव यांचे ७०० रुपये रोख रक्कम, दिलीप वसंत भालेराव यांच्या घरातील एलईडी टीव्ही, इस्त्री आदी वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. मारुती भीमाजी भालेराव, लक्ष्मण भीमाजी भालेराव, रामदास भीमाजी भालेराव, सूरज विठ्ठल भालेराव, प्रभाकर दगडू भालेराव, सचिन शांताराम भालेराव, जालिंदर सीताराम भालेराव, विलास भालेराव व दगडू भालेराव यांच्या बंद घराची कुलपे तोडून कपाटे फोडण्यात आली. परंतु, तेथे काहीच मिळाले नसल्याने चोरट्यांनी कपडे व अन्य वस्तू इतरत्र फेकून दिल्या आहेत. 

मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कांबळे, बिट अंमलदार राजेंद्र हिले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Web Title: robbery in kalamb pune district