रोहन कुंभार यांना ‘आयर्न मॅन’ पदक

रोहन कुंभार
रोहन कुंभार

पिंपरी - जगातील सर्वांत खडतर आणि आव्हानात्मक म्हणून ओळखली जाणारी जर्मनी येथील २२८ किलोमीटर अंतराची ‘आयर्न मॅन’ शर्यत निगडी प्राधिकरण येथील धावपटू रोहन कुंभार यांनी १३ तास ५ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना कुंभार हे ‘आयर्न मॅन’ पदकाचे मानकरी ठरले. मलेशिया येथील २०२० मधील नियोजित ‘आयर्न मॅन’ शर्यतदेखील पूर्ण करण्याचे लक्ष्य कुंभार यांनी ठेवले आहे.    

वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी)तर्फे, जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे स्पर्धा झाली. हॅम्बुर्गमधील ‘सिटी पार्क’ येथून सकाळी ६ किलोमीटर अंतर धावण्याच्या शर्यतीने स्पर्धेला सुरवात झाली. कुंभार यांनी हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतरचे, १८० किलोमीटर सायकलिंगचे अंतर त्यांनी साडेसहा तासांत पार केले. शेवटच्या टप्प्यातील ४२ किलोमीटरचे अंतर त्यांनी ५ तास ४० मिनिटांत धावून पूर्ण केले.

कुंभार म्हणाले,‘‘जर्मनीत शर्यतीच्या दिवशी ३२ अंश सेल्सियस तापमान होते. स्पर्धेच्या दोन दिवस अगोदर जलतरण स्पर्धा रद्द झाली. त्याऐवजी स्पर्धकांसमोर अतिरिक्त धावण्याचे लक्ष्य संयोजकांनी ठेवले. ४२ किलोमीटर अंतर धावताना खूप तहान लागली होती. मात्र, नियमित ‘एनर्जी ड्रिंक’ मार्गावर उपलब्ध नसल्याने दुसरेच ‘एनर्जी ड्रिंक’ घ्यावे लागले. सरावात कधी त्याचा वापर केला नव्हता. त्यामुळे, त्याचा फायदा होण्याऐवजी थोडेसे नुकसानच झाले. हे अंतर साडेचार तासांत पूर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट होते. परंतु तासभर उशिराने म्हणजे ५.३० तासांत हे अंतर पूर्ण करता आले.’’

कुंभार यांनी ३० ते ३४ वर्षे वयोगटात २६५ धावपटूंमध्ये २२२ वे स्थान मिळविले.

स्पर्धा मार्गावरील सराव फायद्याचा ठरला
जर्मनीत ‘सायकलिंग’ संस्कृती कुंभार यांना दिसून आली. सायकलींसाठी रस्त्यालगत स्वतंत्र मार्गिका असून, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण सायकलीचा वापर करत असल्याचे कुंभार यांना आढळून आले. प्रत्यक्ष शर्यतीपूर्वी, सायकलिंगच्या स्पर्धा मार्गावर कुंभार यांना सराव करता आला. त्याचा शर्यतीत त्यांना खूप फायदा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com