esakal | अजबच ! सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत पाच वर्षात झाले ३ सरपंच तर ८ उपसरपंच
sakal

बोलून बातमी शोधा

Rohini Gilbile is eighth Vice Sarpanch in five years in Shikrapur
  • शिक्रापूरात पाच वर्षात आठव्या उपसरपंच रोहीणी गिलबीले

अजबच ! सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत पाच वर्षात झाले ३ सरपंच तर ८ उपसरपंच

sakal_logo
By
भरत पचंगे

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षातील तब्बल आठव्या आणि शेवटच्या क्रमांकाच्या उपसरपंच होण्याचा मान रोहीणी दत्तात्रय गिलबीले यांना मिळाला. कोयाळी (ता.खेड) येथील विस्थापित होवून तीस वर्षांपासून शिक्रापूरकर झालेल्या गिलबीले परिवारातील रोहीणी गिलबीले यांचे पती दत्तात्रय गिलबीलेही शिक्रापूर ग्रामपंचायतीवर यापूर्वी उपसरपंचपदी राहिलेले आहेत.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

२३ ऑगष्ट रोजी मुदत संपत असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीचा गेल्या पाच वर्षातील काळ मोठा रंजक राहिला आहे. माजी सभापती मंगलदास बांदल व शिरुर बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे अशी थेटपणे दोन पॅनलची रंगत सन २०१५च्या निवडणूकीत राहिली. त्यावेळी दोन्ही पॅनलला प्रत्येकी आठ-आठ असे बलाबल राहिल्याने एक अपक्ष भगवानराव वाबळे यांचेवर ग्रामपंचायतीची सत्ता चावी राहिली. मात्र बांदलांच्या गोटात शिरुर एक सदस्य फोडण्याचे कसब मांढरेंच्या पॅनलने साधल्याने त्यावेळी अंजनाबाई भुजबळ सरपंचपदी तर उपसरपंचपदी स्वत: आबाराजे मांढरे राहिले.

पुढे सरपंच बदलाच्या राजकारणात दोन वर्षांनी बांदल पॅनलने या राजकारणाचे उट्टे काढीत जयश्री भुजबळ यांना सरपंच केले. पुढे मांढरे यांची पत्नी कुसुम मांढरे या जिल्हा परिषदेत पोहचल्या तर स्वत: मांढरे शिरुर बाजार समितीत गेल्याने उपसपंचपदाचा राजिनामा त्यांनी दिला. याच काळात बांदलांच्या पत्नी रेखा बांदल याही दूस-या गटातून जिल्हा परिषदेत पोहचल्या.

दरम्यान, मोठ्या कौशल्याने मिळविलेले अंजनाबाई भुजबळांचे सरपंचपद हातातून जावून ते बांदल गटाच्या जयश्री भुजबळ यांचेकडे गेल्याच्या स्थितीत मांढरेंच्या पॅनलला पुढील काळात फक्त सुजाता खैरे यांनाच उपसरपंच करता आले. त्यापुढे नवनाथशेठ सासवडे, सागर सायकर, अनिता दिघे, जयश्री दोरगे आणि शेवटी आत्ता रोहीणी गिलबीले अशा उर्वरित आपल्या सदस्यांना उपसरपंच करण्यात बांदल गट यशस्वी झाला. दरम्यान, तब्बल साडेचार वर्षे उपसरपंचपदासाठी दबा धरुन बसलेल्या अपक्ष भगवानराव वाबळे यांनाही बांदल गटाचे प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी उपसरपंच आणि कोरोनाच्या काळात प्रभारी सरपंच म्हणूनही गावात मिरविल्याने बांदल गटातील प्रत्येकाला सरपंच-उपसरपंच खुर्चीचा राजतिलक लावण्याचे राजकारण बांदल गटाने यशस्वी करुन दाखविले.

नाही तर सगळे सदस्य सरपंच-उपसरपंच झाले असते...!
शिक्रापूरचे राजकारण मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे, रामभाऊ सासवडे यांचेबरोबरच माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, अरुणदादा करंजे, सोमनाथ भुजबळ, बाबासाहेब सासवडे आदी मंडळींभोवतीच फिरते. वर्षभरापूर्वी दोन्ही पॅनलचे वाद संपवून एकुण १७ सदस्यांपैकी प्रत्येकाला सरपंच वा उपसरपंच करण्याच्या दृष्टीने आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, अरुणदादा करंजे यांचे समवेत एक बैठक मंगलदास बांदल, रामभाऊ सासवडे यांनी पुण्यात घेतली होती. मात्र काही स्थानिक घडामोडींच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय प्रत्यक्षात आला नाही अन्यथा सर्व सदस्य सरपंच-उपसरपंचांच्या खुर्चीचे मानकरी ठरले असते.

loading image
go to top