
- अजिंक्य धायगुडे
पुणे - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज युवा संघर्ष यात्रेची घोषणा केली. मागील आधिवेशनापासून युवकांचा प्रश्नावर रोहित पवार प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तरुणांशी संवाद आणि सपंर्क साधला जावा या उद्देशाने पदयात्रा काढली जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
दसऱ्याचा मुहूर्तावर पुण्यापासून नागपूर पर्यंत एकूण ८४० किमी ही पदयात्रा असणार आहे. राहुल गांधी यांनी पाठीमागील काळात भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत एकूण ३५७० किमी अंतर पूर्ण करून देशातील १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून काढली होती. आज रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची घोषणा केल्यानंतर त्यांना तुम्ही महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहात का?, असा प्रश्न विचारण्यात आला यावर रोहित पवारांनी सविस्तर उत्तर दिले.
रोहित पवार म्हणाले, 'मी कोणीही होऊ पाहत नाही. आपण कोणत्याही गोष्टीतून प्रेरणा घेऊ शकतो. या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी यात्रा काढल्या. मी त्यातून प्रेरणा घेतली. महात्मा गांधींनी देखील यात्रा काढली होती. मी त्यातून प्रेरणा घेतली. नंतरच्या काळात काही नेत्यांनी यात्रा काढल्या त्यातूनही मी प्रेरणा घेतली. राहुल गांधीच्या यात्रेतून देखील मी प्रेरणा घेतली आहे . त्यामुळे प्रेरणा कशातून घ्यावी हा ज्याचा त्याचा विषय आहे. चांगल्या प्रेरणा घेण्यात काय वाईट आहे.'
रोहित पवार म्हणाले, 'एक युवा म्हणून कुठेतरी वाटतेय आपण युवकांशी संपर्क साधण्यासाठी यात्रा काढावी. यात्रा काढत असताना ती युवा संघर्ष यात्रा नावाने काढण्याचा विचार आम्ही सर्वानी मिळून केलेला आहे. यात्रा कुठेही सायकलवर , गाडीवर, रथात अश्याप्रकारची यात्रा नाही. ही संपूर्णपणे पदयात्रा आहे. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दिशा या राज्याला आणि देशाला दिली.
त्याचं बरोबर संतपीठं देहू आणि आळंदी, पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन युवांना विश्वासात घेऊन पहिल्या दिवशी म्हणजे २४ तारखेला दसऱ्यादिवशी ५ ते ६ किमीची यात्रा पुणे शहरातून काढली जाईल. त्यानंतर गाडीने सर्वजण शिरूर तालुक्यातील तुळापूर येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन दुसऱ्या दिवशी पासून म्हणजेच २५ तारखेपासून यात्रेची सुरुवात होणार आहे.