Rohit Pawar write letter to homeowners on Facebook
Rohit Pawar write letter to homeowners on Facebook

माणुसकी आता नाही तर, कधी दाखवायची? रोहित पवार यांचे घरमालकांना पत्र

पुणे : कोरोनाच्या संकटाने कष्टकरी, मजूर, शेतकरी, कामगार यांची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे. त्यातच घराचे भाडे थकल्याने घरमालक व भाडेकरू यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. पुण्यात काही ठिकाणी तर सामान बाहेर फेकून देण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत आमदार रोहित पवार यांना विद्यार्थी, कामगार यांनी फोन करून कैफियत मांडली. त्यावर पवार यांनी सर्व घरमालकांना उद्देशून पत्र लिहिले आहे. त्यामध्ये परस्थितीचे वास्तव्य मांडताना "माणुसकी आता नाही तर कधी दाखवायची " असा प्रश्नही केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रोहित पवार यांनी लिहिलेले पत्र पुढील प्रमाणे 

समस्त घरमालक बंधू,
सप्रेम नमस्कार!
आज मी तुम्हाला हे पत्र लिहितोय, त्याला कारणही तसंच आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीही घरभाड्याबाबत मी आपल्याला विनंती केली आहे. काही जणांना वाटत असेल की, मी वारंवार हे का बोलतोय, पण गेल्या काही दिवसांपासून मला असंख्य फोन आले. हे लोक भाड्याबाबत अगदी कळवळून बोलत होते, काहींना तर फोनवर आपले अश्रू आवरणही कठीण झालं होतं, म्हणून आपल्याशी हा पत्रप्रपंच ...

कोरोना हे जागतिक संकट असून त्याचा फटका बसला नाही अशी एकही व्यक्ती सध्या सापडणार नाही. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, ग्रामीण, शहरी अशा सगळ्यांवरच हे संकट आहे. यात सगळेच भरडले असतील तर सर्वांनीच एकमेकांना हात देऊन उभं करण्यासाठी मदत नको का करायला? तसा विचार केला तर गरीब, हातावर पोट असलेला असंघटीत क्षेत्रातील कामगार, रस्त्यावर छोटा-मोठा व्यवसाय करणारे, शेतकरी, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी, वेटर, रिक्षावाले या तुलनेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाला या संकटाची झाळ मोठ्या प्रमाणात बसलीय. वास्तविक कोरोनाची झळ सर्वांनाच बसलीय पण या वर्गाकडे हा फटका सहन करण्याची आर्थिक क्षमता नाही. एरवी आज काम केलं नाही तर उद्या घरची चुल पेटेल की नाही याची शाश्वती नसते आणि आता सुमारे तीन महिने झाले हा वर्ग प्रचंड संघर्ष करतोय. बहुतांशी याच वर्गातील लोक, कामगार, विद्यार्थी, छोटे दुकानदार, टपरीचालक हे शहरात सिंगल रूम किंवा दोन रूम गाड्याने घेऊन राहतात. विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची, गजुरांची मुलही यात गोठ्या प्रमाणात आहेत. हे सगळेच अडचणीत आहेत. भाडे देण्यासारखी त्यांची खरोखरंच आज परिस्थिती नाहीये.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने त्यांच्यापुढं भलामोठ प्रश्नचिन्ह उभं केलंय, म्हणून त्यांना मदतीची गरज आहे. मग घरमालकांनी अशा काळात माणुसकी दाखवायची नाही तर कधी दाखवायची? अनेक घरमालकांनी माणुसकी दाखवलीही आहे. काहींनी संपूर्ण भाडं माफ केलं, काहींनी निम्म भाई माफ केले तर काहींनी भाडे देण्यासाठी मोठी सवलत दिली. माणुसकी धर्म जपलेल्या या सर्वच भल्या माणसांचे मी मनापासून आभार मानतो. पण अजूनही अनेक घरमालक भाड्यासाठी तगादा लावत आहेत, काहींनी तर विद्यार्थ्यांचे सामानही बाहेर काढल्याच्या बातम्या आल्या. हे पाहून अतिशय दु:ख झाले. महाराष्ट्रासारख्या राज्यात असं घडत असेल तर हे योग्य नाही. वास्तविक काही घरमालकांचीही अडचण आहे.

एखाद-दुसरी खोली भाड्याने देऊन आलेल्या भाड्यातूनच त्यांचा प्रपंच चालत असतो. अशा मालकांची अडचण आपण समजू शकतो. पण व्यावसायिक अथवा अधिक उत्पन्न असलेले घर मालक यांनी मात्र आपल्या भाडेकरुला आज मदतीचा हात देण्याची गरज आहे. तुम्ही आज मदतीचा हात दिला तर तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. ही माणुसकीची ताकद आहे. राज्य व केंद्र सरकार आपल्यापरीने लोकांच्या हिताची काम करतच आहेत, पण जबावदार, संवेदनशील माणूस म्हणून आपलीही जबाबदारी आहे. काही प्रश्न हे कायद्याच्या, नियमांच्या पलीकडे जाऊन सोडवायचे असतात. आज कोरोनाचं संकट आलं नसलं तर घरभाडं माफ करा किंवा कमी करा असं तुम्हाला कुणीही म्हणलं नसलं. अडचण आहे म्हणूनच तुम्हाला विनंती करतोय. या विनंतीला मान देऊन सद्सद्विवेकबुद्धीनुसार तुम्ही भाड्याबाबत योग्य निर्णय घ्याल, असा मला विश्वास आहे.

धन्यवाद। 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com