भोरड्यांचे थव्यांचे आता शहराकडे स्थलांतर (व्हिडिओ)

PNE19P22748.jpg
PNE19P22748.jpg

बारामती : मागील काही दिवसांपासून बारामती शहरानजिकच्या मळद किंवा शिरवलीच्या बाभळी पट्ट्यातील संध्याकाळ अधिकच मनमोहक बनते. आभाळाला जशी लाली चढेल तसतशी जणू आभाळालाच सलामी देत लाख-लाख भोरड्या मनोहारी नृत्याविष्कार करतात आणि काळोखात बुडू पाहणाऱ्या संध्याकाळला जाग आणतात.

भोरड्या आणि बारामती-इंदापूर तालुका किंवा माळशिरस तालुक्याचा काही भाग हे गेल्या कैक वर्षांपासूनचे समीकरण आहे. मात्र अलिकडील काही वर्षात एरवी माळरानातील, निर्मनुष्य भागातील पाझर तलावांच्या कडेच्या बाभळीवर आपले वास्तव्य करणाऱ्या या पळस मैनांना अन्न व पाण्याच्या शोधात शहरालगतच्या भागाचा, बारमाही बागायती भागाचा आधार कधी घ्यावा लागला हे देखील कळले नाही. त्यामुळेच माळरानावरील त्यांचा वावर एरवी फारसा कळायचा नाही. आता तो डोळ्यात उठून दिसू लागला आहे.

बारामती शहरानजिक तांदूळवाडी, मळद येथील भैय्या वस्तीचा परिसर, शिरवली नजिकचा परिसर किंवा मुढाळे, निरावागजच्या परिसरातील भोरड्यांच्या कवायती सध्या पक्षीप्रेमींना भुरळ घालू लागल्या आहेत. दरवर्षी थंडीच्या काळात बारामती तालुक्यात या साळभोरड्या किंवा भोरड्या किंवा पळस मैना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्यांचा किलकिलाट संध्याकाळच्या वेळी बाभळींची दाटी आणि जवळ पाण्याचे अस्तित्व असलेल्या भागात नक्कीच ऐकू येतो. सोनगाव, मुढाळे, सुप्याचे अभयारण्य, तांदूळवाडी, मळद, शिरवली व निरावागज या ठिकाणी सध्या भोरड्या कमी अधिक प्रमाणात वास्तव्यास आहेत. संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळी आपल्या नियोजित मुक्कामी विसावण्यापूर्वी या भोरड्या नेत्रदिपक असा नृत्याविष्कार करतात. जवळपास अर्धा-पाऊणतासाचा हा `लाईव्ह शो` अगदी पुण्यापासून ते बारामतीपर्यंतच्या पक्षीप्रेमींना चांगलीच भुरळ घालू लागला आहे. 

संध्याकाळी अन्नाच्या शोधातून परत फिरताना मुक्कामाच्या ठिकाणी आले की, 100-150 पक्ष्यांचे थवे एकामागोमाग एकमेकांत मिसळत नृत्य करतात. हळूहळू त्यांची संख्या वाढत जाते आणि त्यांचे प्रचंड आकाराचे होणारे थवे, त्यांची न चुकणारी कवायत, शेजारी-शेजारी असूनही न धडकता त्यांचे वेगात गिरकणे पाहणाऱ्यांनाही मोहित करते. वेगवेगळ्या प्रकारात नाचून झाल्यानंतर एकामागोमाग एक करीत व अचानक साऱ्याच जणी अंधाराबरोबर त्यांच्या मुक्कमात गुडूप होतात. हे पक्ष्यांचे लक्ष-लक्ष थवे पाहण्यासाठी सध्या पक्षीप्रेमी गर्दी करीत आहेत.

''भोरड्या अन्नाच्या शोधात असल्या तरी गेल्या काही वर्षात त्यांचे शहरानजिक येणे आपल्यासाठी विचार करायला लावणारे आहे. माळराने शेतीखाली येऊ लागली असली तरी पाण्याची समस्या कायम आहे. पाण्याच्या शोधात भोरड्या शहरांच्या शेजारी येऊ लागल्या आहेत. थोडक्यात पूर्वी दक्षतेसाठी होणाऱ्या त्यांच्या या कवायती आता माणसाळल्या आहेत. मात्र तरी देखील किटकनियंत्रण करण्यातही त्यांचा वाटा मोठा आहे. बारामती तालुक्यातील पक्षीप्रेमी त्यामानाने नशिबवान आहेत.''
 - डॉ. महेश गायकवाड, पक्षी अभ्यासक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com