कृषी विद्यापीठांमधील प्रवेशासाठी वाढीव फेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुणे - राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुन्हा फेरी होणार आहे. त्यानुसार चार विद्यापीठांच्या मुख्यालयी म्हणजेच राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे नऊ ते अकरा ऑक्‍टोबरदरम्यान वाढीव प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

पुणे - राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पुन्हा फेरी होणार आहे. त्यानुसार चार विद्यापीठांच्या मुख्यालयी म्हणजेच राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली येथे नऊ ते अकरा ऑक्‍टोबरदरम्यान वाढीव प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

अंतिम गुणवत्ता यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज करायचा नाही. मात्र, अन्य इच्छुक विद्यार्थ्यांनी २६ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश अर्ज करायचे आहेत. तसेच, समवेत आवश्‍यक ती मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. विनाअनुदानित महाविद्यालयांकडील संस्थात्मक कोट्यात रिक्त जागा राहिल्यास आणि त्या जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी द्यायच्या असल्यास संबंधित महाविद्यालयांनी ३० सप्टेंबरपर्यंत कळवायचे आहे, असे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे संचालक हरिहर कौसडीकर यांनी सांगितले.

कृषी परिषदेने वाढीव फेरीचे वेळापत्रक तयार केले असून, ते http://www.dtemaharashtra.gov.in>, <http://www.mcaer.org>, <www.maha-agriadmission.in   या संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिले आहे. पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही केंद्रीय प्रक्रियेत ९३१ आणि संस्थात्मक कोट्यात ५९६ अशा एक हजार ५२७ जागा रिक्त राहिल्या आहेत. तसेच, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकालही लागलेला आहे. त्यातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी द्यायची असल्याने ही फेरी घेण्यात येत असल्याचे कौसडीकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: round for admission to Agricultural Universities