वर्तुळाकार मार्ग ७,५०० कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

फेरनिविदेची नामुष्की?
महापालिकेच्या कोणत्याही कामाची निविदा ही अंदाजित खर्चाच्या २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त किंवा १५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी दराने आल्यास ती निविदा रद्द करून फेरनिविदा काढली जाते. कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा जादा दराने आल्याने फेरनिविदा काढावी लागली होती. याच प्रकारे नदी सुधार प्रकल्पाची निविदाही जादा दराने आल्याने ती रद्द करावी, अशी शिफारस केंद्राकडे केली आहे. त्यामुळे ‘एचसीएमटीआर’ची फेरनिविदा काढण्याची नामुष्की प्रशासनावर येऊ शकते.

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरांतर्गत वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) उभारणीसाठी मोठा गाजावाजा होत आहे. परंतु, त्यासाठी राबलिलेल्या निविदा प्रक्रियेत खर्चाची रक्कम ४४ टक्‍क्‍यांनी फुगवली गेल्याने याचा खर्च तब्बल ७ हजार ५२५ कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यात वाहतुकीसाठी वर्तुळाकार मार्ग सुचविण्यात आला होता. हा प्रकल्प रखडल्याने ही योजना केवळ कागदावरच राहिली. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर झाल्याने गेल्या दीड वर्षापासून हा प्रकल्प मार्गी लावण्यास गती देण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांतून जाणाऱ्या ‘एचसीएमटीआर’ मार्गाची लांबी ३६ किलोमीटर असून, यात सरकारी व खासगी जमिनीचा समावेश आहे. महापालिकेने या प्रकल्पाच्या कामासाठी सल्लागार नेमला असून, अधिकाऱ्यांचे खास पथकही तयार केले आहे.

प्रशासनाने या संपूर्ण एलिव्हेटेड मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करताना त्याचा खर्च ५ हजार १९२ कोटी रुपये गृहित धरला होता. यात दोन चिनी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी भागीदारीतून निविदा भरल्या आहेत. त्यांची कागदपत्रे चिनी भाषेत असल्याने त्याचा अभ्यास करून या निविदा शनिवारी (ता. ५) उघडण्यात आल्या. त्यामध्ये गावर व एका चिनी कंपनीने ७ हजार ५२५ कोटी रुपये आणि अदानी व चिनी कंपनीने ७ हजार ९६६ कोटी रुपयांचा खर्च दाखवला आहे. गावर कंपनीची निविदा कमी रकमेची असल्याने ती मान्य होऊ शकते. परंतु, ही निविदा तब्बल ४४ टक्‍क्‍यांनी जास्त आल्याने हा प्रकल्प पुणे महापालिकेला परवडणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. 

‘एचसीएमटीआर’साठी दोन कंपन्यांच्या निविदा आल्या असून, त्या निविदांमध्ये खर्च ४४ टक्‍क्‍यांनी जास्त आहे. महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराकडून या निविदांचे विश्‍लेषन करून घेतले जाईल. त्यानंतर प्रशासन या निविदा स्वीकारायच्या का नाहीत याचा निर्णय घेईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

‘एचसीएमटीआर’ प्रकल्प 
३६ किलोमीटर मार्गाची लांबी
३३ चढ-उतारासाठी रॅम्प
५,१९२ कोटी अंदाजे खर्च
७,५२५ कोटी निविदेतील रक्कम
किमान ३ वर्षे कामाचा कालावधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rounded Ring Road Expenditure HCMTR