चक्राकार वाहतूक तासाभरात स्थगित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

कोथरूड - कर्वे रस्त्यावरील अभिनव (नळस्टॉप) चौकात चक्राकार वाहतूक योजनेची चाचणीला सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरवात करण्यात आली. मात्र, कर्वे रस्त्यासह पौड रस्त्यावरही पुन्हा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने एका तासातच हा प्रयोग थांबविण्यात आला. पुढील दोन दिवसांसाठी हा प्रयोग स्थगित करण्यात आल्याची माहिती महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नळस्टॉप चौकाकडे जाणारी वाहतूक एसएनडीटी महाविद्यालय जवळील जुन्या कालव्यावरील रस्त्याने वळविण्यात आली होती. या वेळी पंधरा - वीस मिनिटांतच पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगर चौक ते कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालया दरम्यानच्या अंतरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकामध्ये मेट्रोचे कामामध्ये दुमजली उड्डाण पूल बांधण्यासाठी या चौकातील वाहतूक चक्राकार योजनेद्वारे वळविण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती. मात्र अपुरे नियोजन आणि अपुऱ्या मनुष्यसंख्येअभावी ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली.

मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग करण्यात येत आहे. मात्र त्याचा नागरिकांना त्रास होता कामा नये. यासाठी जादा वॉर्डनची नेमणूक करून येत्या दोन-तीन दिवसांत ही योजना पुन्हा राबविणार आहे.
- अतुल गाडगीळ, मुख्य व्यवस्थापक, महामेट्रो

चक्राकार योजनेचा प्रयोग ‘मेट्रो’च्या वतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे पुढील सर्व निर्णय मेट्रोचे अधिकारीच घेणार आहेत.
- प्रतिभा जोशी, वाहतूक पोलिस निरीक्षक.

Web Title: Rounded Transport Stop