‘रिपब्लिकन’ने गड राखला

पांडुरंग सरोदे  - @spandurangSakal
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) पुन्हा एकदा आपला गड राखला. रिपब्लिकनच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देतानाच भाजपच्या एका उमेदवारावरही मतदारांनी विश्‍वास दाखविला, तर एका जागेवर विजय मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. 

आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या प्रभागात रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) पुन्हा एकदा आपला गड राखला. रिपब्लिकनच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देतानाच भाजपच्या एका उमेदवारावरही मतदारांनी विश्‍वास दाखविला, तर एका जागेवर विजय मिळविण्यात राष्ट्रवादीला यश आले. 

कळस-धानोरीमध्ये भाजपचे तीन उमेदवार निवडून आल्यानंतर फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातही हाच ‘पॅटर्न’ चालण्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्याच पद्धतीने याही प्रभागात तीन भाजप-रिपब्लिकनचे व एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. डॉ. सिद्धार्थ धेंडे, ॲड. फरजाना शेख व शीतल सावंत यांच्यामुळे भाजपचे ‘पॅनेल’ मजबूत झाले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीत ऐनवेळी दाखल झालेल्या सुनील टिंगरे, नगरसेवक सुनील गोगले, उज्ज्वला नलावडे आणि काँग्रेसच्या शिवानी माने यांच्यामुळे राष्ट्रवादीचे पॅनेलही मजबूत होते. मात्र कळस-धानोरीप्रमाणेच याही प्रभागात आमदार जगदीश मुळीक यांनी स्वतः लक्ष घातले होते; तसेच टिंगरे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांच्यातच खरी लढत होण्याचे चित्र अधिच स्पष्ट झाले होते.

प्रभागातील ‘अ’ गटात भाजप-रिपब्लिकनचे डॉ. धेंडे व राष्ट्रवादीच्या गोगले यांच्यात खरी लढत होण्याची शक्‍यता होती.  पहिल्याच फेरीत डॉ. धेंडेंपेक्षा गोगले यांनी २६ मते अधिक मिळविली. त्यामुळे डॉ. धेंडें यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला चिंता पसरली. दुसऱ्या फेरीनंतर डॉ. धेंडे यांनी ८५३ इतके मताधिक्‍य घेतले. त्यानंतर मात्र त्यांची मते वाढत गेली. बहुजन समाज पक्षाचे सचिन धिवार यांनीही दुसऱ्या फेरीत चांगली मते घेतली. अखेर डॉ. धेंडे यांचा पाच हजार मतांनी विजय झाला. 

मागासवर्ग महिलांसाठीच्या ‘ब’ गटामध्ये भाजप व काँग्रेसमध्ये खरी लढत होण्याची शक्‍यता होती. मात्र इथे आश्‍चर्यकारकरीत्या अपक्षांनी चांगली लढत दिली. भाजप-रिपब्लिकनच्या ॲड. शेख यांनी पहिल्या फेरीत दोन हजार मते घेतली. त्याचवेळी काँग्रेसच्या माने आणि अपक्ष अर्चना कुचेकर यांनी सारखीच मते घेतल्याने चुरस निर्माण झाली होती. पुढच्या दोन फेऱ्यात हेच चित्र काही प्रमाणात पुढे-मागे होत राहिले. मात्र चौथ्या व पाचव्या फेरीत ॲड. शेख यांनी चार हजारांच्या मताधिक्‍याने विजय मिळविला.

महिला सर्वसाधारणच्या ‘क’ गटामध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपच्या शीतल सावंत यांनी पहिल्या फेरीत राष्ट्रवादीच्या नलावडे यांच्या मतांच्या दुपटीपेक्षा जास्त मते मिळविली. दुसऱ्या फेरीतही हीच परिस्थिती कायम राहिली. चौथ्या फेरीत मात्र नलावडे यांनी साडेतीनशे मते घेतली. अखेर सावंत यांनी ५८८८ इतके मताधिक्‍य मिळवत विजय साकार केला.

खुल्या गटामध्ये भाजपच्या सुभाष चव्हाण यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे टिंगरे वरचढ ठरण्याची चर्चा आधीपासून होती. टिंगरे हे पहिल्या फेरीपासूनच चव्हाण यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळवत गेले. पाचव्या फेरीपर्यंत चव्हाण यांना टिंगरे यांच्यापेक्षा जास्त मते मिळविता आली नाहीत. अखेर टिंगरे यांनी चव्हाण यांना साडेनऊ हजार मतांनी पराभूत केले. 

या प्रभागात ३७ हजार २३० लोकांनी मतदान केले. त्यापैकी साडेचार हजार जणांनी ‘नोटा’चा वापर करत उमेदवारांना नाकारले. ही बाब राजकीय पक्ष व उमेदवारांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

Web Title: rpi party win in ward-2