राहुल गांधी यांनी "कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

आमच्यावर उपकार करता का? 
सभेच्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने आठवले यांनी आघावपणा, बकवासगिरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. सभेत बोलू दिले नाही, म्हणून असा प्रकार करणे योग्य नाही. सभेला गर्दी जमवता म्हणजे आमच्यावर उपकार करता का? शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

पुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता "संविधान बचाव' नाही, तर "कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिला. कोरेगाव भीमा दंगलीनंतर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मी खमका आहे, असा इशाराही त्यांनी दिला. 

आरपीआयच्या राज्यव्यापी अधिवेशनात आठवले यांनी पक्षाची पुढील दिशा काय असेल, हे स्पष्ट केले. दलितांना न्याय मिळवून देण्यासाठीच 

आपण भाजपबरोबर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. शिवसेना भाजपबरोबर असली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, स्वागताध्यक्ष एम. डी. शेवाळे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते. 

आरपीआय हा तळागाळातील लोकांचा पक्ष असल्याचे नमूद करीत आठवले यांनी काही मागण्या मांडल्या. ते म्हणाले, ""2014 पर्यंतच्या झोपड्यांचे पुनर्वसन करावे, शेतकऱ्यांप्रमाणे दलितांनाही कर्जमाफी द्यावी, गायरान जमिनीचा प्रश्‍न सोडवावा, भूमिहीनांना पाच एकर जमीन द्यावी, कच्चे घर असणाऱ्यांना पक्के घर द्यावे.'' 

पालकमंत्री बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे यांनी घटना बदलणार नाही, आरक्षणाला धक्का लावणार नाही, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करणार नाही; तर तो अधिक कडक करणार असल्याचे नमूद केले. 

आठवले म्हणाले 
- कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे यांचा संबंध आहे का, याचा तपास करा. संबंध आढळल्यास कायद्यापेक्षा कोणीच मोठे नाही. 
- देशाच्या घटनेला धक्का लागला, तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन. 

आमच्यावर उपकार करता का? 
सभेच्या ठिकाणी एका कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने आठवले यांनी आघावपणा, बकवासगिरी सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला. सभेत बोलू दिले नाही, म्हणून असा प्रकार करणे योग्य नाही. सभेला गर्दी जमवता म्हणजे आमच्यावर उपकार करता का? शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. 

लहान राज्यात संघटना वाढविणार : आठवले 
पुणे - केंद्र सरकारमध्ये असूनही अन्य राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपचे नेते रिपब्लिकन पक्षाशी (आरपीआय-आठवले गट) साधी चर्चाही करीत नाहीत, असे सांगत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची याबाबत भेट घेणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगितले. देशभरातील लहान राज्यांत पक्षसंघटना वाढविणार असल्याचेही ते म्हणाले. 

पक्षाच्या अधिवेशनानिमित्त राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पक्षाचे नेते अविनाश महातेकर, सरचिटणीस मोहन पाटील, उपाध्यक्ष व्यंकट स्वामी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. 

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत "आरपीआय'ने भाजपला मोठी साथ दिली आहे. आगामी निवडणुकांमध्येही भाजपसोबत राहणार आहोत; पण अन्य राज्यांतील निवडणुकांसाठी त्यांनी आपला विचार केला पाहिजे, ही बाब त्या पक्षाच्या नेत्यांच्या कानावर घातली जाईल, असे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील प्रत्येक गावात पक्षसंघटना पोचण्यासाठी विशेष मोहीम, सदस्य नोंदणी आदी उपक्रम राबविण्याचे निर्णयही झाल्याचे महातेकर यांनी सांगितले. 

Web Title: RPI Statewide Session in pune