येरवडा कारागृहाच्या तिजोरीत नऊ दिवसांत १० लाख रुपये जमा

दिलीप कुऱ्हाडे
Monday, 16 November 2020

दिवाळीनिमित्त खास आकाशकंदील, पणत्या, शोभेच्या वस्तू बनवितो. यंदाच्या दिवाळीला अवघ्या नऊ दिवसांत नऊ लाख ७५ हजार रुपयांची विक्री झाली असल्याची माहिती येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.

येरवडा -  ‘सुधारणा व पुनर्वसन’ उपक्रमांतर्गत बंदिजनांनी तयार केलेले कपडे, फर्निचर, चपला, आकाशकंदील, पणत्यांची अवघ्या नऊ दिवसांत सुमारे १० लाख रुपयांची विक्री झाली आहे. त्यामुळे कारागृहाच्या उद्योग केंद्राची खऱ्या अर्थाने ‘दिवाळी’ झाली.  

‘कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन’ हे कारागृहाचे ब्रीद आहे. त्यामुळे कारागृहातील कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन विविध उद्योगांत गुंतवून ठेवले जाते. यामध्ये येरवडा कारागृहाच्या कारखान्यात हातमाग, यंत्रमाग, सुतारकाम, चर्मकला, लोहारकाम, बेकरी उद्योग सुरू आहेत. कारखान्यातील लाकडी फर्निचर, देव्हारे, किचन, सतरंजी, टॉवेल, बेडशीट आदी वस्तूंना नागरिकांची दरवर्षी मोठी मागणी असते. अनेक लाकडी टेबल, खुर्च्या, छपाई, पुस्तक बांधणी आदींना शासकीय कार्यालयांच्या ऑर्डर्स मिळतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळीनिमित्त खास आकाशकंदील, पणत्या, शोभेच्या वस्तू बनवितो. यंदाच्या दिवाळीला अवघ्या नऊ दिवसांत नऊ लाख ७५ हजार रुपयांची विक्री झाली असल्याची माहिती येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली. कारागृहातील कारखान्यात वर्षभर कैद्यांना काम असते. त्यामुळे विविध कामांत गुंतलेल्या कुशल कैद्यांना ६१ रुपये, अर्धकुशल कैद्यांना ५५ रुपये तर अकुशल कैद्यांना ४४ रुपये रोज पगार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कारागृहाच्या मालकीची येरवड्यात सुमारे दीडशे एकर शेती आहे. या शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग कारागृहात असलेल्या कैद्यांच्या न्याहरीपासून जेवणापर्यंत होतो.

पैठणीसाठी वेटिंग 
येरवडा खुल्या कारागृहात पैठणी साड्या तयार केल्या जातात. त्याचे दर बाजारभावापेक्षा खूपच कमी असल्यामुळे त्याला विशेषतः महिला ग्राहकांची अधिक पसंती आहे. मात्र, कारागृहातील पैठणी साडीचे उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने पैठणीसाठी वेटिंग लिस्ट असल्याचे पवार यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 10 lakh deposited in the coffers of Yerawada Jail in nine days

Tags
टॉपिकस
Topic Tags: