आरएसएस, एमआयएम एकाच माळेचे मणी -पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

पिंपरी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)आणि एमआयएम हे एकाच माळेचे मणी आहेत. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी एमआयएमला पुढे केले जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पिंपरी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)आणि एमआयएम हे एकाच माळेचे मणी आहेत. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी करण्यासाठी एमआयएमला पुढे केले जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी मोशी येथे आयोजित केलेल्या अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘‘इच्छा शक्‍ती असेल तर कसे बदल घडतात हे सर्वांना आपण दाखवून दिले. मात्र, विकास करताना कोणताही भेदभाव केला नाही. एका धर्माचा आदर करताना दुसऱ्याचा अनादर केला नाही. मुस्लिम समाजाने कधीही भाजपला मतदान केले नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून मुस्लिम समाज भयभीत झाला आहे. मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातची दंगल थांबवून ते शांतता प्रस्थापित करू शकले असते; मात्र त्यांनी तसे केले नाही.

पवार म्हणाले, ‘‘अनेक धर्मात व्याज घेणे पसंत नाही, त्यामुळे ही मंडळी पैसे घरात ठेवतात. मग त्यांचा पैसा काळा कसा? नोटा बदलून देण्याची तारीख उलटून गेल्यावरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आम्ही नोटा बदलून देतो, असे म्हणतातच कसे? दुष्काळ नसताना आम्ही केंद्र सरकारकडून निधी आणल्याचे धडधडीत खोटे बोलतात, असेही पवार यांनी सांगितले.

दादा, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीत
मेळाव्यात राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांची नावे वाचून दाखविताना एका महिलेचे नाव दादांनी घेतले. मात्र भाषण सुरू असताना त्या महिलेने आक्षेप घेतला. मी स्थापनेपासूनच राष्ट्रवादीत असल्याचे दादांना सांगितले. मग दादांनी चिठ्ठी कोणी दिली याची विचारणा भर सभेत केली. महिलांना असे अपमानित करू नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

Web Title: RSS, MIM same