'RSS'कडून भाजपच्या नेत्यांना कानपिचक्‍या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेसाठी उमेदवार देताना काळजी घ्यावी. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही आणि मतदारांच्या विश्‍वासाला धक्का बसणार नाही अशा पद्धतीने उमेदवार द्यावेत, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

पुणे : भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेसाठी उमेदवार देताना काळजी घ्यावी. पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणार नाही आणि मतदारांच्या विश्‍वासाला धक्का बसणार नाही अशा पद्धतीने उमेदवार द्यावेत, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत.

पुणे महापालिकेत सत्ता आणण्याच्या प्रयत्नाच्या नावाखाली पक्षाच्या नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि गुंडगिरीची पार्श्‍वभूमी असलेल्या इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिला आहे. यामुळे भाजपविषयी आस्था असणाऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खटकणाऱ्या बाबी भाजप नेत्यांच्या कानावर अखेरीस घातल्याच. त्यामुळे भाजप नेत्यांनी आधी तयार केलेली उमेदवार यादी बदलण्यासाठी पुन्हा बैठकांचा जोर लावला आहे.

याबाबत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की आम्ही विशिष्ट नावाला कात्री लावा किंवा एखाद्या नावाचा आग्रह या बैठकीत अजिबात धरला नाही. मात्र गुंडांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळता कामा नये, हे बजावून सांगितले. तसेच एखाद्या मतदारासंघात जुना कार्यकर्ता निवडणुकीसाठी सक्षम असेल तर त्याचा प्राधान्याने विचार करायला हवा. पुण्यात पक्षाचे दोन खासदार, एक केंद्रिय मंत्री, राज्य मंत्रिमंडळात दोन मंत्री, आठ आमदार असे संख्याबळ आहे. याचाच अर्थ पुण्यात पक्षाला मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. 

एवढी ताकद असताना केवळ आयात उमेदवारांवर पक्ष अवलंबून राहिला असल्याचा संदेश जाणे चुकीचे आहे. ओबीसींच्या राखीव जागांवर त्याच समाजातील उमेदवारांना संधी देण्याचा आग्रह संघाने धरला. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे भाजपमधून उमेदवारी लढविण्याचे मराठा उमेदवारांचे स्वप्न भंगणार आहे. इतर प्रांतातील उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे सुचविण्यात आले आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात उत्तरेतील मतदार आहेत. हा मतदारही दुर्लक्षित राहता कामा नये, अशी कल्पना यामागे आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे संघाचे कार्यकर्ते महापालिकेच्या प्रचारात उतरणार का, या प्रश्‍नावर या पदाधिकाऱ्याने सांगितले की संघाचे कार्यकर्ते नेहमीच भाजपसोबत असतात. यात वेगळ्या सूचना देण्याची गरज भासत नाही. संघ कधीच भाजपच्या दैनंदिन कारभारात लक्ष घालत नाही, असे स्पष्ट करत मात्र गरज असेल तर योग्य सूचना देण्याच्या जबाबदारीपासून पळही काढत नाही, असे या पदाधिकाऱ्याने नमूद केले.

 

Web Title: rss slams bjp leaders in pune