यंदा आरटीई प्रवेशाची एकच सोडत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

संभाव्य वेळापत्रक

  • २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी शाळांची पडताळणी 
  • ११ ते २९ फेब्रुवारी ऑनलाइन नोंदणी 
  • ११ व १२ मार्च लॉटरी सोडत
  • १६ मार्च ते ३ एप्रिल कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेशनिश्‍चिती 
  • १३ एप्रिल ते २२ मे प्रवेशाच्या याद्या प्रसिद्ध

पुणे - बालकांच्या मोफत व सक्‍तीच्या शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्‍के राखीव जागांसाठी यंदा फेब्रुवारीत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच, तीन फेऱ्यांऐवजी प्रवेशासाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यासाठी यंदा नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) द. गो. जगताप यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी आरटीई प्रवेशप्रक्रियेत तीन टप्प्यांत लॉटरी काढण्यात येते. गेल्या वर्षी एकूण चार फेऱ्या घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी प्रवेशप्रक्रिया सुरूच होत्या. शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य पालकांना बसला होता. यामध्ये पालकांना सोयीच्या शाळा न मिळाल्यामुळे बहुसंख्य जागा रिक्तच राहिल्या. त्यामुळे अनेक पालकांनी या प्रवेशाकडे काणाडोळा केला होता. 

ऑनलाइन अर्जप्रक्रिया
यंदा प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात येणार आहे. मागील वेळी लॉटरीत नाव आले तरी केवळ कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांना आत्तापासूनच कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशासाठी अगोदर शाळांना उपलब्ध जागांची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर पालकांना प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

प्रवेशासाठी आवश्‍यक कागदपत्रे 
विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिधापत्रिका, वीजबिल, वाहन परवाना, मिळकत कर पावती, गॅस पुस्तक, बॅंकेचे पासबुक, पासपोर्ट, मतदार कार्ड, आधार कार्ड यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाईल. जन्मतारखेचा दाखला, २०१८-१९, २०१९-२० या दोन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. एस.ई.बी.सी. प्रवर्गाचा समावेश वंचित घटकात करावा, एकल पालकांनी त्यांची कागदपत्रही जोडणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rte admission only one draw