आरटीईअंतर्गत प्रवेश नाकारल्याची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी - बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २५ टक्‍क्‍यांतर्गत प्रवेशित बालकांना प्रवेश नाकारल्याची पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

पिंपरी - बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २५ टक्‍क्‍यांतर्गत प्रवेशित बालकांना प्रवेश नाकारल्याची पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. ऑनलाइन प्रक्रियेमार्फत उचित कार्यवाही आवश्‍यक असताना निश्‍चित केलेल्या कालावधीत शाळा प्रवेश देण्यास टाळाटाळ करत आहे. १५ जूनपासून २०१८-१९ शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली; परंतु, अजूनही मुलांना परवाताव्याअभावी प्रवेश दिला नाही. याबाबत पालकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत शिक्षण विभाग प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला. शाळेला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, नियमानुसार आजच प्रवेश निश्‍चित करणे आवश्‍यक आहे. तसेच प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहिल्यास अथवा संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेवर कारवाई केली जाईल. तसेच पाल्यांना प्रवेश दिला की नाही, याविषयी शाळेने अहवाल सादर करावा. मात्र, शाळा व्यवस्थापनाने दाद दिली नाही. उलट शाळा व्यवस्थापनाने पालकांकडे एका महिन्याचे शुल्क भरण्यास सांगितले आहे. सरकारकडून परतावा मिळाल्यावर शुल्क परत करू, असे लेखी सांगितले आहे.

आरटीई कायद्यानुसार शिक्षण संस्थांनी बालकांना प्रवेश देणे आवश्‍यक आहे. शुल्क परतावा सरकारकडून मिळणारच आहे. 
- ज्योत्स्ना शिंदे,  प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग महापालिका

सरकारकडून चार वर्षांचा परतावा मिळालेला नाही. शिक्षकांचे पगार कुठून करायचे? काही पालकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यांनी शुल्क भरून प्रवेश घ्यावेत. 
- निळकंठ चिंचवडे,  संस्थाचालक न्यू इंग्लिश स्कूल, बिजलीनगर

Web Title: RTE Admission oppose complaint