
पुणे : ‘आरटीई’ २५ टक्के राखीव जागांवर आतापर्यत ५१ टक्के प्रवेश निश्चित
पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील सोडतीत (लॉटरी) निवड झालेल्या बालकांपैकी आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी ५१.४९ टक्के बालकांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २९) मुदत आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येते. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेतील सोडत यापूर्वी जाहीर झाली आहे. राज्यातील नऊ हजार ८६ शाळांमधील एकूण एक लाख एक हजार ९०६ जागांसाठी एकूण दोन लाख ८२ हजार ७८३ अर्ज आले होते. त्यापैकी सोडतीत राज्यातून ९० हजार ६८५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यातील ४६ हजार ९९५ विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९५७ शाळांमधील १५ हजार १२६ जागांसाठी ६२ हजार ९६० अर्ज आले होती. त्यातील १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी सोडतीत निवड झाली असून त्यातील सात हजार ७०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप निश्चित झाले आहेत.
इन्फोबॉक्स :
पालकांसाठी सूचना :
प्रतीक्षा यादीत नाव असणाऱ्या पालकांनी आता ॲडमिट कार्डची प्रिंट काढू नये.
प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ‘आरटीई पोर्टल’वर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील.
प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन पालकांनी प्रवेशाची प्रक्रिया करावी
लॉटरी लागलेल्या बालकांच्या पालकांनी ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
ॲलॉटमेंट लेटर आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळील पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा
पडताळणी केंद्रावर प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.
आतापर्यंत निश्चित झालेल्या प्रवेशाचा आढावा :
जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : एकूण आलेले अर्ज : सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : आत्तापर्यंत निश्चित झालेले प्रवेश
पुणे : ९५७ : १५,१२६ : ६२,९६० : १४,९५८ : ७,७०३
ठाणे : ६४८ : १२,२६७ : २५,४१९ : १०,४२९ : ५,८५७
नागपूर : ६६३ : ६,१८६ : ३१,४११ : ६,१०६ : ३,००२
नाशिक : ४२२ : ४,९२७ : १६,५६७ : ४,५१३ : २,५५१
जळगाव : २८५ : ३,१४७ : ८,३५४ : २,९४० : १,८६१
Web Title: Rte Secured 51 Percent Admission In 25 Percent Reserved Seats
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..