#RteAdmission शिक्षण हक्कावर गंडांतर

मीनाक्षी गुरव
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

आरटीई आरक्षणांतर्गत केवळ ५८ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश
पुणे - वाहनचालक असलेले धन्यकुमार सुकाळे आपल्या सहा वर्षांच्या मुलीला शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षणांतर्गत प्रवेश मिळावा म्हणून  सहा-सात महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत तब्बल पाच प्रवेश फेऱ्या झाल्या; पण अद्याप त्यांच्या मुलीचे नाव यादीत आले नाही. लेकीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून नाइलाजास्तव त्यांनी एका खासगी शाळेत प्रवेश घेतला.

एका शाळेत चालक म्हणून काम करून गुंडाप्पा गायतोंडे हे संसाराचा गाडा हाकताहेत. त्यांनीही सहा-सात महिन्यांपूर्वी आरटीई आरक्षण प्रवेशप्रक्रियेत अर्ज केला. अनेकदा हेलपाटे मारूनही अद्याप त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला शाळेत प्रवेश मिळालेला नाही.

...सुकाळे असो वा गायतोंडे, अशा वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनेक पालकांच्या मुला-मुलींचा शिक्षणाचा हक्क अप्रत्यक्षरीत्या डावलला जात असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे वंचित घटकातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळतोय का? असा सवाल उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज भरताना राहत्या ठिकाणाजवळील शाळा निवडण्याचा पर्याय पालकांसमोर होता. एखाद्या शाळेत २५ जागा असतील, तर त्यासाठी जवळपास पाचशे ते एक हजारपर्यंत पालक अर्ज करीत होते. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकले नाहीत. आता यापुढे प्रवेशाच्या फेऱ्या होऊ शकणार नाहीत.
- दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

आरटीई २५ टक्के आरक्षणांतर्गत प्रवेशप्रक्रियेत गेल्या वर्षीदेखील ५० ते ५१ टक्केच प्रवेश झाले होते. गेल्या काही वर्षांपासून असाच अनुभव येत आहे. या जागा पूर्णपणे भरल्या जाव्यात, यासाठी सरकार ठोस पावले उचलत नाही. परिणामी, हजारो विद्यार्थी शिक्षण हक्कापासून डावलले जात आहेत. 
- सुरेखा खरे, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा

राज्यातील आकडेवारी (२०१८-१९)
शाळांची संख्या ८,९७६
प्रवेशाच्या जागा १,२६,११२
आलेले अर्ज १,९९,०४५
प्रवेश घेतलेले विद्यार्थी ७३,६३७

पुणे महापालिका
प्रवेश फेऱ्या ४
शाळांची संख्या २२१
प्रवेश घेतलेले विद्यार्थी ४,०३१

Web Title: #RteAdmission Education School