नियम माहिती नाही अन्‌ वाहन परवाना हवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

सिग्नलवर कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर थांबावे, कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर गाडी पुढे न्यावी, झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह कोणते, अशा साध्या प्रश्नांचीही उत्तरे न आल्याने हे नागरिक नापास झाले आहेत. जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यालाच नापासांच्या संख्येत वाढ होत आहे.

पुणे - वाहतूक नियमांची माहिती नाही; परंतु वाहन चालविण्याचा परवाना हवा आहे, अशी स्थिती सध्या परवाना काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात दिसून येत आहे. कारण गेल्या दहा महिन्यांमध्ये तब्बल तीन हजार 262 नागरिक लर्निंग लायसन्ससाठी घेतलेल्या परीक्षेत नापास झाले आहेत.

सिग्नलवर कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर थांबावे, कोणत्या रंगाचा दिवा लागल्यावर गाडी पुढे न्यावी, झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह कोणते, अशा साध्या प्रश्नांचीही उत्तरे न आल्याने हे नागरिक नापास झाले आहेत. जानेवारी ते ऑक्‍टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्यालाच नापासांच्या संख्येत वाढ होत आहे. या दहा महिन्यांमध्ये साठ हजार 701 उमेदवारांनी दुचाकी व चारचाकीसाठी लर्निंग लायसन्सची परीक्षा दिली. यामध्ये चाळीस हजार 104 पुरुष उमेदवारांचा, तर वीस हजार 597 महिला उमेदवारांचा समावेश होता. त्यामध्ये दोन हजार 262 पुरुषांना, तर एक हजार 80 महिलांना सिग्नल किती दिवे असतात, त्यांचे रंग, कोणता रंग कशासाठी, या प्रकारच्या साध्या प्रश्नांचीही उत्तरे देता आली नाहीत. जानेवारी महिन्यामध्ये सहा हजार 244 नागरिकांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 147 नागरिक नापास झाले, तर ऑक्‍टोबर महिन्यात पाच हजार 249 नागरिकांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 425 नागरिक नापास झाले आहेत. यावरून वाहतूक नियमांची माहिती न घेताच वाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

उमेदवाराला प्रश्‍नावली उपलब्ध व्हावी
लर्निंग लायसन्ससाठी आरटीओकडून तीस सेकंदांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये 427 प्रश्नांपैकी 15 प्रश्न विचारले जातात. यापैकी नऊ प्रश्नांची उत्तरे बरोबर देणे गरजेचे असते. आरटीओमध्ये रोज दोनशे ते अडीचशे नागरिकांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने प्रत्येक उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रश्नावली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे.

Web Title: RTO fails 3000 aspiring drivers