दंडवसुलीने चालकांना धास्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सोशल मीडियावर खिल्ली
भरमसाट दंड आकारणीची सोशल मीडियावर खिल्ली उडविली जात आहे. दोन ते तीन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारलेल्या दंडाच्या रकमेत नवीन गाडी येईल, अशाप्रकारचे विनोदी मेसेज मागील आठवड्याभरापासून व्हायरल होत आहेत.

पिंपरी - केंद्र सरकारने मागील आठवड्यापासून मोटार वाहन कायद्यात बदल केले आहे. त्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पूर्वीपेक्षा तिप्पट ते पाचपट दंड होणार आहे. राज्यात अद्याप या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली नसली, तरी शहरातील वाहनचालकांनी मात्र नव्या नियमानुसार आकारल्या जाणाऱ्या भरमसाट दंडाची धास्ती घेतली असल्याचे दिसून येते.  

सुधारित दंडाच्या रकमेबाबत राज्य सरकारने अद्याप अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे सध्या पिंपरी-चिंचवडसह राज्यात जुन्या दराने दंडवसुली सुरू आहे. मात्र अनेक वाहनचालकांना याबाबतची कल्पना नाही. शहरात नवीन नियमानुसारच दंड आकारणी सुरू झाल्याचे वाहनचालकांचा समज असल्याने पूर्वीपेक्षा पाच ते दहापटीने आकारल्या जाणाऱ्या दंडाची वाहनचालकांनी धास्ती घेतली आहे. पूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना फारसा विचार केला जात नव्हता. शंभर अथवा दोनशे रुपये दंड भरून बिनधास्तपणे वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही अधिक होते. मात्र आता दंडात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने हा दंड न परवडणारा आहे. त्यामुळे आता आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना अनेकदा विचार केला जात आहे. चौकात वाहतूक पोलिस दिसताच दूर अंतरावरूनच धूम ठोकली जात आहे. 

दंडाच्या रकमेत बदल झाल्याने दंड आकारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ई-चलन स्वाइप मशिनमध्येही बदल करावे लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO Fine Recovery by RTO