आरटीओमध्ये रॅम्पचा अभाव

अवधूत कुलकर्णी
मंगळवार, 15 मे 2018

पिंपरी - मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिफ्ट व रॅम्पचीही सोय नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या दिव्यांगांचे हाल होत आहेत.

पिंपरी - मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिफ्ट व रॅम्पचीही सोय नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या दिव्यांगांचे हाल होत आहेत.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चिखली येथून मोशी येथे डिसेंबर २०१७ मध्ये स्थलांतरित झाले. या कार्यालयात रोज कामानिमित्त शहरासह लोणावळा, आंबेगाव, नारायणगाव आदी भागांतील नागरिक येत असतात. वाहनांचे पासिंग करणे, नवीन वाहनांची नोंदणी करणे यांसारख्या कामांसाठी नागरिक या कार्यालयात येतात. परंतु तेथे लिफ्टची सुविधा नाही. एवढेच नव्हे तर दिव्यांगांसाठी रॅम्पचीही सुविधा नाही. वस्तुतः इमारत बांधतानाच रॅम्पची सुविधा करणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांनाही त्रास होतो. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना हृदयविकारासारखे गंभीर आजार असतात. अशावेळी त्यांना जिने चढउतार केल्याने त्रास होऊ शकतो. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला असा त्रास झालाच तर जवळपासच्या खासगी रुग्णालयात उपचार करून घेणे सर्वांनाच आर्थिकदृष्ट्या परवडेलच असे नाही. महापालिकेचा मोशी येथे छोटा दवाखाना आहे, परंतु येथून लांब आहे.  सरकारने या इमारतीसाठी रॅम्प व लिफ्टसाठी निधी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु ती सुविधा अद्याप का झाली नाही, हे एक कोडेच आहे. 

मी नुकतीच नवीन दुचाकी घेतली. त्याच्या पासिंगसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागले. परंतु येथील अधिकारी सारखे याच्याकडून सही घेऊन या, त्याच्याकडून सही घेऊन या असे सांगतात. लिफ्ट नसल्याने जिने चढउतार करून त्रास होतो. सरकारने तातडीने दिव्यांगांसाठी रॅम्प, लिफ्टची सुविधा करायला हवी. 
- राजू हिरवे, दिव्यांग, चिखली

इमारतीत लिफ्टची व्यवस्था करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. लवकरच लिफ्टची सुविधा होईल. दिव्यांगांना त्रास होऊ नये म्हणून अधिकारीच जिने उतरून त्यांची कामे करतील. तसा फलक लवकरच जिन्यालगत लावणार आहे. - 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोशी

Web Title: RTO Office Moshi Ramp Lift handicapped