आरटीओचे काम सकाळी आठला सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नागरिकांच्या कामांना होणारा विलंब आणि नागरिकांच्या रांगा टाळण्यासाठी आरटीओने कार्यालयीन वेळेचे विशेष नियोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता आरटीओ कार्यालयातील कामकाजास सुरवात करण्यात आली. तसेच प्रत्येक खिडकीवरील कर्मचारी संख्या वाढविण्यात आली आहे.

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नागरिकांच्या कामांना होणारा विलंब आणि नागरिकांच्या रांगा टाळण्यासाठी आरटीओने कार्यालयीन वेळेचे विशेष नियोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता आरटीओ कार्यालयातील कामकाजास सुरवात करण्यात आली. तसेच प्रत्येक खिडकीवरील कर्मचारी संख्या वाढविण्यात आली आहे.

"वाहन 4.0' प्रणालीत गुरुवारी बिघाड झाल्याने कामकाज तब्बल तीन तास ठप्प झाले होते. अतिरिक्त व्यवस्था निर्माण करून नागरिकांच्या कामाचा निपटारा करण्यात आला. या प्रकाराची नागरिकांनी थेट परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे आज आरटीओ कार्यालयात वेगळेच चित्र पाहावयास मिळाले. कालच्या प्रकाराची दखल घेऊन आरटीओनेदेखील कामकाजात बदल केला.

या संदर्भात परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी म्हणाले, ""प्रत्येक वेळी अतिरिक्त व्यवस्था करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे उपलब्ध परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांची कामे वेळेत करून देण्यासाठी कामकाजात बदल करण्यात आला आहे. वेळेचे नियोजन करून प्रत्येक खिडकीवर जादा कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.''
आरटीओमध्ये सात खिडक्‍यांवर नागरिकांची विविध कामे होत आहेत.

त्यामुळे संबंधित खिडकीवर एखाद्या कामासाठी किती वेळ लागतो, याचा अभ्यास करून प्रत्येक खिडकीवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कामांचा ताण कमी करण्यासाठी आजपासून सकाळी आठ वाजताच कामकाज सुरू करण्यात आले आहे. कामाचा ताण कमी होईपर्यंत दररोज सकाळी आठ वाजताच ते सुरू होईल. रिक्षा चालकांच्या कामांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, आळंदी रस्त्यावरील कार्यालयातील ही समस्या सोडविण्यासाठी त्या ठिकाणीही अतिरिक्त अधिकाऱ्यांची नेमणूक केली असल्याचे आजरी यांनी सांगितले.

आयुक्तांना व्हॉट्‌सऍपवर फोटो
गुरुवारी आरटीओमध्ये झालेल्या गोंधळाचे फोटो काही नागरिकांनी थेट परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना व्हॉट्‌सऍपवर पाठविले होते. मात्र, शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांची कामे विनाविलंब होत असल्याने आज फारशी गर्दी झाली नाही. त्यामुळे आरटीओतील कामकाज सुरळीत झाले असल्याचे फोटो आजरी यांनी गेडाम यांना व्हाट्‌सऍपद्वारे पाठविले.

Web Title: rto work start at morning