Pune Rains : देवच गेला, तर घटस्थापना कसली..?

अजित घस्ते
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पुरामुळे माझा नातू आमच्यातून निघून गेला... आमच्या सर्वांचा तो आधार होता... देवचं आमच्यातून निघून गेला आहे तर मग घटस्थापना कसली करायची, असे सांगताना रुक्‍मिणी शिंदे यांना गहिवरून आले होते.

सहकारनगर - होय, आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. परंपरेनुसार घटस्थापना करायला हवी... पण पुरामुळे माझा नातू आमच्यातून निघून गेला... आमच्या सर्वांचा तो आधार होता... देवचं आमच्यातून निघून गेला आहे तर मग घटस्थापना कसली करायची, असे सांगताना रुक्‍मिणी शिंदे यांना गहिवरून आले होते.

आंबिल ओढालगत असलेल्या टांगेवाला कॉलनीत बुधवारी आलेल्या पुरात गोरगरिबांचे संसार वाहून गेला. पुरानंतर गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणचे रहिवासी पुन्हा संसार उभा करण्यासाठी झटत आहेत. रविवारी सकाळपासून नागरिक घरात साचलेला चिखल आणि गाळ काढत असल्याचे चित्र दिसून आले. या पुरात जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

पुरात सुरक्षा भिंत पडल्याने रुक्‍मिणीबाईंचा नातू रोहित भरत आमले (वय १५) याचा मृत्यू झाला. रोहित याला आई नसल्याने तो आपल्या आजी व मामाकडे राहत होता. ‘‘नातू गेल्यामुळे कुटुंबावर संकट कोसळले आहे. होत्याचे नव्हते झाले. नातूच राहिला नाही, तर घटस्थापना कसली करणार! देवच निघून गेला घटाचे काय,’’ अशी भावना व्यक्त करताना रुक्‍मिणीबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. 

आम्हाला या ठिकाणी राहायचे नाही
टांगेवाला कॉलनी परिसरात भिंत पडून सहा जणांचा मृत्यू झाला. यामुळे रहिवाशांमध्ये अजूनही शोककळा पसरली आहे.आम्हाला आता या ठिकाणी राहायचे नाही. सरकारने आमची दुसरीकडे राहण्याची सोय करावी, अशा अपेक्षा या भागातील नागरिकांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rukmini Shinde expressed his feelings after floods