पळा पळा रस्ता ओलांडा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पादचाऱ्यांसाठीच्या सिग्नलचा ‘ग्रीन टाइम’ फक्त १० सेकंद

शहरातील कोणताही मोठा रस्ता घ्या.. तो ओलांडण्यासाठी तरुणांना किमान २० ते २५ सेकंद लागत असतील, तर ज्येष्ठ नागरिकांना किती वेळ लागेल, हे वेगळे सांगायला नको.. पण महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला आहे फक्त दहा सेकंद... 
 

पादचाऱ्यांसाठीच्या सिग्नलचा ‘ग्रीन टाइम’ फक्त १० सेकंद

शहरातील कोणताही मोठा रस्ता घ्या.. तो ओलांडण्यासाठी तरुणांना किमान २० ते २५ सेकंद लागत असतील, तर ज्येष्ठ नागरिकांना किती वेळ लागेल, हे वेगळे सांगायला नको.. पण महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला आहे फक्त दहा सेकंद... 
 

पुणे - शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील पादचारी सिग्नलचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात आले, की पादचाऱ्यांसाठी देण्यात आलेला वेळ हा निम्म्याहून कमीच आहे. केवळ तेवढेच नव्हे तर, पादचाऱ्यांसाठीच्या सिग्नलचा ‘ग्रीन टाइम’ १० सेकंद आणि रेड टाइम दोन ते तीन मिनिटे असा आहे. म्हणजे एकतर तुम्ही दहा सेकंदात पलीकडे जा नाहीतर आणखी तीन मिनिटे थांबा आणि पुढच्या संधीची वाट पाहा... याच कारणास्तव अनेक पादचारी रस्ता कुठूनही आणि केव्हाही ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा जीव धोक्‍यात घालतात. 

पादचाऱ्यांची कोंडी
भाऊसाहेब खुडे नारायणगावकर चौक (वेधशाळेसमोर, शिवाजीनगर)
निरीक्षण ः झेब्रा पट्ट्यांवरून चालणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोरून येणारी वाहने आणि शिवाजीनगर पोलिस चौकीसमोरील सिग्नलवरून वाहने एकाच वेळी सुटत असल्यामुळे रस्ता ओलांडता येत नाही. 

पादचारी सिग्नलच नाही 
रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ ः किमान २५ ते ३० सेकंद 
झेब्रा पट्टे अस्पष्ट 
आकाशवाणीशेजारच्या सिग्नलवर ‘टायमर’ आहे. अन्यत्र टायमर नाही 

बेलबाग चौक 
निरीक्षण - शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा बेलबाग चौक. या चौकाच्या परिसरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर असून, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली असते. वाहनांसाठी हिरवा सिग्नल सुरू असतानाही पादचारी रस्ता ओलांडत असतात. तर, पादचाऱ्यांसाठी हिरवा सिग्नल सुरू असताना काही वाहनचालक थांबत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता अधिक. 

पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी किमान १५ ते २० सेकंद लागतात. 
पादचारी सिग्नल हिरव्या दिवा वेळ - १० सेकंद 
झेब्रा क्रॉसिंग अस्पष्ट
टायमर नाही

वाहने झेब्रा पट्ट्यांवर!
भा. द. खेर चौक, सिंहगड रस्ता 
निरीक्षण - सिग्नलवर वाहने झेब्रा पट्ट्यांवर उभी राहात असल्याने रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना वळसा घालून जावे लागते. त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागतो. झेब्रा पट्टा सोडून चौकाच्या मधूनच रस्ता ओलांडण्याचे प्रमाण जास्त आहे.

चारपैकी फक्त दोन पादचारी सिग्नल सुरू 
पादचारी सिग्नलच्या लाल दिव्याचा कालावधी ः एक मिनीट ४८ सेकंद 
पादचारी सिग्नलच्या हिरव्या दिव्याचा कालावधी ः १० सेकंद 
रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ ः किमान २० ते ३० सेकंद 
झेब्रा पट्टे बऱ्यापैकी सुस्थितीत
टायमर उपलब्ध नाही 

नवीन ‘सिग्नल’ बंद! 
गाडीतळ चौक, हडपसर 
निरीक्षण - प्रचंड गर्दी असलेल्या या चौकात नव्यानेच बसविलेले ‘सिग्नल’ अद्यापही सुरू नाहीत. त्यामुळे ‘पादचारी सिग्नल’, ‘टायमर’, ‘झेब्रा क्रॉसिंग’ असे काहीच इथे दिसण्याचा प्रश्‍नच नाही; तर दुसरीकडे ना भरधाव वाहनांवर नियंत्रण, ना रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी. वाहतूक पोलिस गप्पा मारण्यात मश्‍गूल. अशा परिस्थितीत आपल्या मुलांच्या, वृद्धांच्या हाताला धरत जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना कुठून, केव्हा, कोणती गाडी येऊन धडकेल, याची भीती चेहऱ्यावर दिसते. हडपसरचे मुख्य बसस्थानक चौकातच आहे.

त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या आणि नोकरीनिमित्त शहराच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची येथे रीघ असते. महाविद्यालय, शाळा व रुग्णालये, भाजी मंडई, चित्रपटगृह या चौकाच्या जवळ असल्याने रहदारी जास्त आहे. वृद्ध नागरिक तर १०-१५ मिनिटे वाहने थांबण्याची वाट पाहत असल्याचेही चित्र असते. 

सिग्नल - सुरू नाही 
रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ - २० ते ३० सेकंद 
झेब्रा क्रॉसिंग - एका रस्त्यावर अस्पष्ट स्वरूपात आहे, उर्वरित रस्त्यांवर नाही

गाडीतळ चौक पादचाऱ्यांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा बनला आहे. सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे बस, अवजड वाहने, रिक्षा, अवैध वाहतूक करणाऱ्या जीप, कार अतिशय वेगात चौकातून ये-जा करतात. काही क्षणही वाहने थांबत नाहीत. त्यामुळे पादचारी सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकत नाही. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होते. आम्हाला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. पोलिसही वाहतुकीला शिस्त लावत नाहीत. पादचारी ‘झेब्रा क्रॉसिंग’चा वापर करतील किंवा पादचारी सिग्नल पाळतीलही; परंतु त्या दृष्टीने त्याची रचनाच केलेली नाही.
- नवनाथ भोसले, पादचारी 

विद्यार्थी, महिला व वृद्धांना रस्ता ओलांडता येत नाही. परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्ता ओलांडणाऱ्यांमध्ये विद्यार्थी व महिला सर्वाधिक असतात. शिवाजीनगर चौकातील सिग्नलला टायमर नाहीत. त्यामुळे वाहनचालक गाडी सुरूच ठेवून वेगात निघण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा वाहने पादचाऱ्यांच्या अंगावर येतात. लोकल येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी पोलिस किंवा वॉर्डनची गरज आहे. 
- मयूरेश कुलकर्णी, विद्यार्थी

रस्ता कुठूनही ओलांडणे गुन्हा : पादचारी भुयारी मार्ग किंवा पुलाचा; तसेच झेब्रा पट्ट्यांचा वापर न करता रस्ता कुठूनही ओलांडण्याचा प्रकार म्हणजे ‘जेवॉकिंग’. अशा प्रकारे रस्ता ओलांडणे हा गुन्हा आहे. सुरक्षित रस्त्यांसह सुरक्षित पादचाऱ्यांसाठी ‘जेवॉकिंग’ टाळणे महत्त्वाचे आहे. देशात यापूर्वी नवी दिल्लीत डिसेंबर २००७ मध्ये आणि बंगळूर शहरात मार्च २०१३ मध्ये पादचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. मुंबईतही अशा प्रकारची कारवाई झाली होती मात्र त्याचे प्रमाण कमी होते.

पादचाऱ्यांसाठी अपुरा कालावधी
टिळक चौक, अलका चित्रपटगृहाजवळ 
निरीक्षण - चौक मोठा असल्यामुळे बहुतांश पादचारी झेब्रा पट्ट्यांवरूनच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात; पण पादचारी सिग्नलचा कालावधी खूप कमी असल्यामुळे अनेकदा वाहनचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पुलावरून आलेल्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात व्यग्र असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी पादचारी सिग्नलचे उल्लंघन करून जाणाऱ्या भरधाव वाहनांवरही कारवाई करण्याची गरज आहे. 

सर्व पादचारी सिग्नल सुरू 
पादचारी सिग्नलच्या लाल दिव्याचा कालावधी - २ मिनिटे ३० सेकंद 
पादचारी सिग्नलच्या हिरव्या दिव्याचा कालावधी - १० सेकंद 
रस्ता ओलांडण्यासाठी लागणारा वेळ - किमान ३० ते ३५ सेकंद 
झेब्रा पट्टे सुस्थितीत 
टायमर उपलब्ध 

Web Title: run run road cross