Vidhan Sabha 2019 : पुण्यातील तीन ठिकाणचे एबी फॉर्म मिळूनही 'या' महिलेने नाकारली उमेदवारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

पुणे शहरातील पर्वती, वडगाव शेरी आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील एबी फॉर्म देण्याची पक्षाची तयारी असतानाही एका राजकीय पक्षाच्या महिला शहराध्यक्षेने उमेदवारी नाकारण्याची घटना शुक्रवारी शहरात घडली.

पुणे : पुणे शहरातील पर्वती, वडगाव शेरी आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघातील एबी फॉर्म देण्याची पक्षाची तयारी असतानाही एका राजकीय पक्षाच्या महिला शहराध्यक्षेने उमेदवारी नाकारण्याची घटना शुक्रवारी शहरात घडली.

रुपाली पाटील ठोंबरे, असे या माजी नगरसेविकेचे नाव आहे. मनसेच्या महिला शहराध्यक्ष पदावर सध्या त्या काम करीत आहेतत. कसबा विधानसभा मतदारसंघातून त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी हवी होती. त्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. परंतु, पक्षाने तेथून शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पाटील यांनी मुंबईत "कृष्णकुंज'वर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 4) मुंबईहून पुण्यात काही निरोप आला नाही. 

पाटील यांनी पक्षाकडे पुन्हा विचारणा केली अन्‌ अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे सांगितले. हा निरोप मिळताच ठाकरे यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि पर्वती, खडकवासला आणि वडगावशेरी येथील कोरे एबी फॉर्म पुण्यात पाठविले आहेत. तेथून कोठूनही लढा, असे त्यांनी सांगितले. तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नका, पक्षावर विश्‍वास ठेवा, असे आवाहन केले.

Image result for rupali patil

याबाबत पाटील म्हणाल्या, "खुद्द ठाकरे यांनी संपर्क साधल्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केला. राजसाहेबांनी तीन विधानसभा मतदारसंघांपैकी कोणत्याही एका ठिकाणी एबी फॉर्म देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, मला कसब्यातच उमेदवारी हवी होती.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali Patil rejected MNS partys nomination in three constituencies