‘रुपी’च्या ठेवीदारांना दिलासा; ठेवी देण्यासाठी ६८७ कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupee Bank

ठेवी परत कधी मिळतील, याकडे तब्बल ९ वर्षांपासून डोळे लावून बसलेल्या रुपी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला.

‘रुपी’च्या ठेवीदारांना दिलासा; ठेवी देण्यासाठी ६८७ कोटी जमा

पुणे - ठेवी परत कधी मिळतील, याकडे तब्बल ९ वर्षांपासून डोळे लावून बसलेल्या रुपी सहकारी बॅंकेच्या (Rupee Cooperative Bank) ठेवीदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला. ठेव विमा महामंडळाकडून रुपी बॅंकेच्या पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांच्या बॅंक खात्यात ६८७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून, पाच लाखांवरील ठेवीदारांचे भवितव्य अधांतरीच आहे.

तत्कालीन संचालकांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेने रुपी बॅंकेवर फेब्रुवारी २०१३ पासून आर्थिक निर्बंध लावले आहेत. सुमारे पाच लाख ठेवीदारांच्या ठेवी बॅंकेत अडकल्या होत्या. त्यामुळे ठेवीदारांना नऊ वर्षे हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ठेव विमा संरक्षण सुधारित कायद्यानुसार पाच लाखांच्या आतील ठेवी असलेल्या ठेवीदारांना ९० दिवसांत पैसे परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार महामंडळाने रुपीच्या खातेदारांकडून अर्ज मागवून घेतले. रुपीच्या ६४ हजार २४ ठेवीदारांनी त्यांच्या विविध एक लाख २५ हजार ठेव खात्यांसाठी अर्ज सादर केले. त्यांची छाननी झाल्यानंतर महामंडळाकडून सातशे कोटी रुपयांचे क्लेम मंजूर करण्यात आले. बॅंक ऑफ बडोदाद्वारे ठेवीदारांच्या खात्यात ६८७ कोटी ४२ लाख रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासक सुधीर पंडित यांनी दिली.

विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह

सारस्वत बॅंकेने रुपीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे जानेवारीमध्ये दिला होता. रिझर्व्ह बॅंकेने तब्बल दीड महिन्यानंतर या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली. आता ठेवीदारांना सातशे कोटी रुपये परत करण्यात आले. त्यामुळे सारस्वत बॅंकेसोबतच्या विलीनीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रुपीच्या विलीनीकरणासाठी सारस्वत बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेला काही सवलती देण्याबाबत सुचविले आहे. सारस्वत बॅंकेची ही मागणी सकृतदर्शनी रास्त आहे; परंतु त्याला मूर्त स्वरूप न आल्यास रुपीचे पुनरुज्जीवन किंवा लघु वित्त बॅंकेत रूपांतर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल. त्यासाठी पाच लाखांवरील ठेवीदारांचे संपूर्ण योगदान आवश्यक आहे.

- सुधीर पंडित, प्रशासक, रुपी सहकारी बॅंक

रुपी बॅंकेची स्थिती (ठेवीदार आणि ठेव रक्कम)

४,८६,५०८ (७०२ कोटी रुपये) - पाच लाखांपर्यंतचे ठेवीदार

४,७३१ (६०२ कोटी रुपये) - पाच लाखांवरील ठेवीदार

३,२५,००० - दहा हजार रुपयांपर्यंतचे ठेवीदार

९४३ कोटी रुपये त्यापैकी वाटप ६८७ कोटी - एकूण विमा संरक्षित ठेवी

३६५ कोटी रुपये (विमा संरक्षण नाही) - पाच लाखांवरील ठेवी

४०० कोटी - हार्डशिप योजनेंतर्गत ठेवी परत

Web Title: Rupee Cooperative Bank Depositors Consolation 687 Crore For Deposits

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top